राजस्थान रॉयल्स संघासमोरील अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर व बेन स्टोक्स हे दोन प्रमुख खेळाडू आयपीएल २०२१ला मुकले असताना आणखी एका खेळाडूनं बायो बबलला कंटाळून माघार घेतली आहे. इंग्लंडचा फलंदाज लायम लिव्हिंगस्टोन ( Liam Livingstone ) यानं बायो बबलमुळे जाणवत असलेल्या थकव्यामुळे माघार घेण्याचा निर्णय घेतला. सोमवारी तो मायदेशी परतला.
''सोमवारी लायम लिव्हिंगस्टोन मायदेशी परतला. तो गेली एक वर्ष बायो बबलमध्ये आहे आणि त्यामुळे त्याला थकवा जाणवत होता. त्याच्या या निर्णयाचा आम्ही आदर करतो. संघाला जमेल तसा पाठिंबा तो देत राहील,''असे राजस्थान रॉयल्सनं त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
मागील आठवड्यात
बेन स्टोक्सनं बोटाच्या दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलमधून माघार घेतली. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलचा झेल टिपताना त्याच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया करावी लागणार असून तो १२ आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचे
इंग्लंड क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केलं. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्सला तीनपैकी एकच सामना जिंकता आलेला आहे.