दुबई: आयपीएल २०२० मध्ये (IPL 2020) आज चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) सामना सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) होत आहे. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबईत आतापर्यंत ६ आयपीएल सामने झाले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे. त्यामुळे धोनीच्या संघासमोर खडतर आव्हान आहे. त्यातच संघ गुणतालिकेत तळाला असल्यानं विजय आवश्यक आहे.
गेल्या तीनपैकी दोन सामन्यांत पराभूत झालेल्या चेन्नईनं आजच्या सामन्यासाठी तीन बदल केले. अष्टपैलू ड्वेन ब्रावो, अंबाती रायडू आणि शार्दुल ठाकूर यांना संधी देत धोनीनं मुरली विजय, जोश हेझलवूडला न खेळवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे आज चेन्नईच्या संघातून एक मराठी खेळाडू बाहेर गेला, तर दुसरा संघात आला. ऋतुराज गायकवाड रणजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाकडून खेळतो, तर शार्दुल ठाकूर मुंबईच्या संघाचं प्रतिनिधीत्व करतो.
शार्दुल ठाकूरनं दुसऱ्याच षटकात धोनीला दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला. धोनीनं दुसऱ्या षटकाच्या पहिल्यात चेंडूवर चांगली फलंदाजी करणाऱ्या मनिष पांडेला बाद केलं. पांडेनं २१ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीनं २९ धावा फटकावल्या. मनिष पांडेची फलंदाजी पाहता आज एक वेगळाच योगायोग जुळून येण्याची शक्यता होती. २०१९ मध्ये चेपॉक स्टेडियमवर चेन्नई आणि हैदराबादचे संघ आमनेसामने आले होते. त्यावेळी हैदराबादचा जॉनी बॅरिस्टो शून्यावर बाद झाला होता. त्यावेळी पांडेनं ४९ चेंडूत ८३ धावांची घणाघाती खेळी केली होती. आजही बॅरिस्टो भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यामुळे पांडे पुन्हा एकदा वादळी खेळी करणार का, याकडे लक्ष लागलं होतं. पांडेनं सुरुवातही तशी केली होती. मात्र शार्दुलनं त्याला बाद करत संघाला दुसरं यश मिळवून दिलं.