IPL 2020, KXIP vs RCB : Kings XI Punjab won by 8 wickets | IPL 2020, KXIP vs RCB : मयांक, गेल, राहुलचा आरसीबीला दणका, पंजाबचा ८ विकेट्सनी दणदणीत विजय

IPL 2020, KXIP vs RCB : मयांक, गेल, राहुलचा आरसीबीला दणका, पंजाबचा ८ विकेट्सनी दणदणीत विजय

शारजा - यंदाच्या आयपीएलमध्ये गुणतक्त्यात तळाला असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबने गुरुवारी अखेर आपली पराभवाची मालिका खंडित केली. मयांक अग्रवाल, लोकेश राहुल आणि ख्रिस गेल या तीन स्फोटक फलंदाजांनी केलेल्या घणाघातीत फलंदाजीच्या जोरावर पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ८ विकेट्स राखून मात केली. पंजाबचा हा यंदाच्या हंगामातील दुसरा विजय ठरला.

बंगळुरूने दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी जोरदार सुरुवात करून दिली. दोघांनीही बंगळुरूच्या गोलंदाजांना झोडपून काढले. मयांक आणि राहुलने पॉवर प्लेच्या पहिल्या ६ षटकांत ५६ धावा फटकावल्या. दरम्यान, युझवेंद्र चहलने मयांक अग्रवालला बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. मयांकने २५ चेंडून ४५ धावा फटकावल्या.

मयांक अग्रवाल बाद झाल्यानंतर लोकेश राहुल आणि ख्रिस गेलने आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई सुरू ठेवली. गेल (५३) आणि राहुलने (६१) आपापली अर्धशतके पूर्ण करत पंजाबला विजयासमिप नेले. पंजाबला विजयासाठी एक धाव हवी असताना गेल धावचीत झाला. मात्र तोपर्यंत पंजाबचा विजय निश्चित झाला होता. शेवटी सामन्यातील शेवटच्या चेंडूवर निकोलस पूरनने खणखणीत षटकार ठोकत पंजाबला विजय मिळवून  दिला. 

तत्पूर्वी आयपीलएलच्या सुरुवातीच्या सत्रात धावांचा पाऊस पडणाऱ्या शारजामध्ये आज मोठी धावसंख्या रचण्यात विराट कोहलीच्या आरसीबीला अपयश आले. नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण संथ होत असलेल्या खेळपट्टीवर बंगळुरूला निर्धारीत २० षटकांत १७१ धावा करता आल्या. बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४८ के्ल्या.

आरोन फिंच आणि देवदत्त पडिक्कलने बंगळुरूला जोरदार सुरुवात करून दिली. मात्र अर्शदीपने पडिक्कलला १८ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर मुरुगन अश्विनने फिंचा २० धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर विराट कोहलीने एक बाजू लावून धरली. मात्र चौथ्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्सला न पाठवता फलंदाजीच्या क्रमात केलेले बदल आरसीबीला नडले.

वॉशिंग्टन सुंदर (१३), शिवम दुबे (२३) आणि एबी डिव्हिलियर्स (२) यांना आज मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहलीही ४८ धावांवर माघारी परतला. मात्र अखेरच्या षटकांमध्ये ख्रिस मॉरिस (नाबाद २५) आणि इसुरू उडाणा ( नाबाद १०) यांनी जोरदार फटकेबाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला सहा बाद १७१ धावांपर्यंत मजल मारून दिली.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: IPL 2020, KXIP vs RCB : Kings XI Punjab won by 8 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.