India vs Australia, 4th Test : कधीकाळी खेळपट्टीवर 'रोलर' फिरवायचा अन् आज ऑस्ट्रेलियाकडून खेळतोय शतकी कसोटी!

टीम इंडियाकडून पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या टी नटराजनचा प्रवास जसा थक्क करणारा आहे, तसाच ऑस्ट्रेलियन संघाच्या एका खेळाडूचा प्रवासही प्रेरणादायी, अचंबित करणारा आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: January 15, 2021 08:39 AM2021-01-15T08:39:56+5:302021-01-15T08:40:11+5:30

whatsapp join usJoin us
Inspirational Story : The Aussies form a guard of honour to celebrate a century of Tests for Nathan Lyon | India vs Australia, 4th Test : कधीकाळी खेळपट्टीवर 'रोलर' फिरवायचा अन् आज ऑस्ट्रेलियाकडून खेळतोय शतकी कसोटी!

India vs Australia, 4th Test : कधीकाळी खेळपट्टीवर 'रोलर' फिरवायचा अन् आज ऑस्ट्रेलियाकडून खेळतोय शतकी कसोटी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia, 4th Test : टी नटराजननं आजच्या सामन्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण केलं. तामिळनाडूच्या चिन्नाप्पमपट्टी ( Chinnappampatti) गाव ते ब्रिस्बेन कसोटी हा टी नटराजनचा प्रवास खरंच सर्वांना प्रेरणादेणारा आहे. आई चिकन विकायची, तर वडील साडी तयार करण्याच्या कंपनीत कामाला होते. तीन बहिणी आणि तो असा हा परिवार. या सर्व संकटावर मात करून नटराजननं ही फिनिक्स भरारी घेतली.... टीम इंडियाकडून पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या टी नटराजनचा प्रवास जसा थक्क करणारा आहे, तसाच ऑस्ट्रेलियन संघाच्या एका खेळाडूचा प्रवासही प्रेरणादायी, अचंबित करणारा आहे. फरक इतकाच की तो ऑस्ट्रेलियाकडून आज १०० वा कसोटी सामना खेळत आहे.

शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्राथ यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून शंभर कसोटी खेळणारा तो तिसरा गोलंदाज आहे. ३१ ऑगस्ट २०११ मध्ये त्यानं श्रीलंकेविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केलं. क्रिकेटच्या मैदानावरील खेळपट्टीवर रोलर फिरवणारा ते ऑस्ट्रेलियाचा प्रमुख गोलंदाज अशी ओळख त्यानं स्वतःच्या हिमतीवर बनवली. २०१०-११च्या इंग्लंड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन फलंदाज माईक हसी याला फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी तयार व्हायचं होतं. त्यावेळी इंग्लंडच्या संघात ग्रॅमी स्वॉन हा फिरकी गोलंदाज होता. हसीला त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सराव करायचा होता, शेफिल्ड शिल्डमधील अनेक फिरकी गोलंदाजांचा नेट्समध्ये हसीनं सामना केला, परंतु त्याला जे अपेक्षित होतं ते काही सापडत नव्हतं. 

कॅनबेरा ते अॅडलेड या खेळपट्टींवर त्यानं क्युरेटरचं काम पाहिलं. खेळपट्टींवर रोलर फिरवायचं काम तो करायचा. बिग बॅशमधील रेडबॅक्स संघाचे प्रशिक्षक डॅरेल बेरी यांनी या खेळाडूचे कौशल्य हेरले. हसीच्या कानावर या खेळाडूचं नाव पडलं आणि त्यानं नेट्समध्ये त्याला गोलंदाजी करायला सांगितली. त्याच्या गोलंदाजीनं हसी एवढा प्रभावीत झाला की त्यानं टीम मॅनेजमेंटकडे त्या गोलंदाजासाठी शब्द टाकला. जुलै २०११मध्ये त्याची ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात निवड झाली आणि त्यानंतर या गोलंदाजानं मागे वळून पाहिले नाही. मोजक्याच पावलांचं फुटवर्क  घेऊन गोलंदाजी करणं... विकेटसाठी एका गुडघ्यावर बसून दोन्ही हात हवेत उंचावून अपील करणं, शांत, संयमी असा हा गोलंदाज आज शंभरावा कसोटी सामना खेळत आहे.


शेन वॉर्न याच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाला फिरकीपटू म्हणून गवसलेला हा हिराच होता. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत त्याचं नाव तुम्हाला समजलंच असेल.. आपण नॅथन लियॉन (  Nathan Lyon) बद्दल बोलतोय. तो आज शंभरावा कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळेच संघातील खेळाडूंनी मैदानावर उतरताच त्याचा गार्ड ऑफ हॉनरनं सन्मान केला. लियॉननं आतापर्यंत ३९६ विकेट्स घेतल्या आहेत. २०१५मध्ये त्यानं ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या ऑफ स्पिनरचा मान पटकावला. त्यानं ह्युज ट्रम्बल यांचा १४१ विकेट्सचा विक्रम मोडला. त्यानंतर संघसहकाऱ्यांनी त्याला GOAT हे टोपणनाव दिले. 


श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पणात त्यानं चमत्कार केला. तत्कालीन कर्णधार मिचेल क्लार्क यानं १६व्या षटकात लियॉनच्या हाती चेंडू सोपवला. परफेक्ट ऑफ ब्रेक टाकून त्यानं कुमार संगकाराला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या क्लार्ककरवी झेलबाद केले. त्या सामन्यात लियॉननं ३४ धावांत ५ विकेट घेतल्या. डिसेंबर २०१३ मध्ये लियॉननं विकेटचे शतक, जुलै २०१६मध्ये द्विशतक, मार्च २०१८मध्ये त्रिशतक पूर्ण केलं. गॅबा कसोटीत त्याला ४०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी चार बळी टिपावे लागतील. 

Web Title: Inspirational Story : The Aussies form a guard of honour to celebrate a century of Tests for Nathan Lyon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.