भारतीय क्रिकेटच्या पंढरीत मालिका विजयाचे लक्ष्य; भारत वि. वेस्ट इंडिज आज निर्णायक टी२० लढत

क्षेत्ररक्षक, गोलंदाजांवर अधिक जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 03:24 AM2019-12-11T03:24:01+5:302019-12-11T06:09:27+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies third t20 match today in wankhade stadium | भारतीय क्रिकेटच्या पंढरीत मालिका विजयाचे लक्ष्य; भारत वि. वेस्ट इंडिज आज निर्णायक टी२० लढत

भारतीय क्रिकेटच्या पंढरीत मालिका विजयाचे लक्ष्य; भारत वि. वेस्ट इंडिज आज निर्णायक टी२० लढत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याचे मुख्य आव्हान डोळ्यांसमोर ठेवून भारतीय क्रिकेट संघ बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या टी२० सामन्यात खेळेल. मालिका १-१ अशी बरोबरीत असून निर्णायक तिसरी लढत भारतीय क्रिकेटची पंढरी मानली जात असलेल्या वानखेडे स्टेडियमवर होत असल्याने विराट सेनेसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

पहिला टी२० सामना भारताने दिमाखात जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने जबरदस्त पुनरागमन केले. यामध्ये भारतीय खेळाडूंकडून झालेल्या चुकांचाही विंडीजला फायदा झाला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखल्या जाणाºया भारतीयांकडून आतापर्यंतच्या दोन्ही टी२० सामन्यांत अनेक चुका झाल्या. म्हणूनच कर्णधार विराट कोहलीनेही चिंता व्यक्त करताना म्हटले होते, ‘जर क्षेत्ररक्षणात चुका होत असतील, तर कोणत्याही धावसंख्येचे संरक्षण होणार नाही.’ त्यामुळे आता भारतीय क्रिकेटच्या पंढरीत विराट सेनेचा खेळ कसा होणार हे पाहावे लागेल.

क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याबरोबरच भारतीयांपुढे गोलंदाजीमध्ये अचूकता आणण्याचे आणखी एक आव्हान आहे. दुसºया टी२० सामन्यात भारताचे सर्वच गोलंदाज महागडे ठरले होते. विंडीजच्या आक्रमक फलंदाजांपुढे भारताच्या एकाही गोलंदाजाला छाप पाडता न आल्याने कर्णधार कोहलीपुढे मोठी चिंता आहे. दुखापतीनंतर पुनरागमन करणारा भुवनेश्वर कुमारही आपल्या लौकिकानुसार मारा करण्यात अपयशी ठरल्याने यजमानांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. बांगलादेशविरुद्ध चमकलेला दीपक चहर आणि हुकमी फिरकीपटू युझवेंद्र चहल या दोघांनाही अद्याप दमदार मारा करण्यात आलेला नाही. यात भर पडली आहे ती, प्रमुख फलंदाजांमधील कामगिरीत असलेला सातत्याचा अभाव.

पहिल्या टी२० सामन्यात रोहित शर्मा अपयशी ठरल्यानंतर विराट कोहली, लोकेश राहुल यांनी विंडीजची धुलाई केली. मात्र दुसºया टी२० सामन्यात युवा शिवम दुबे आणि रिषभ पंत यांचा अपवाद वगळता कोणालाही फटकेबाजी करता आली नाही. त्यामुळेच अखेरच्या टी२० सामन्यात भारतासाठी प्रमुख फलंदाजांना फॉर्म गवसणे महत्त्वाचे ठरणार आहे. रोहित शर्मा आपल्या घरच्या मैदानावर खेळणार असल्याने त्याच्या फलंदाजीवर सर्वांची नजर असेल. तसेच अष्टपैलू शिवम दुबेलाही घरच्या मैदानाचा फायदा घेण्याची संधी आहे.

दुसरीकडे, विंडीजचा कर्णधार किएरॉन पोलार्डसाठीही वानखेडे स्टेडियम घरचेच आहे. मुंबई इंडियन्सकडून १० वर्षांहून अधिक काळ खेळत असल्याने पोलार्ड येथील परिस्थिती आणि खेळपट्टी चांगल्या प्रकारे ओळखून आहे. याचा निश्चितच विंडीज संघाला फायदा होईल यात शंका नाही.

विंडीजची आघाडीची फळी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सिमन्ससह एविन लुईस, निकोलस पूरन आणि शिमरॉन हेटमायर सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहेत. त्यांना रोखण्याचे मोठे आव्हान भारतीय गोलंदाजांपुढे आहे. याशिवाय विंडीज गोलंदाजांनीही नियंत्रित मारा करीत यजमान भारतीय संघाला जखडवून ठेवण्याची कामगिरी केली.

प्रतिस्पर्धी संघ :

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, संजू सॅमसन, रिषभ पंत, मनीष पांड्ये, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.

वेस्ट इंडिज : किएरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन अ‍ॅलन, ब्रेंडन किंग, दिनेश रामदीन, शेल्डन कॉटरेल, एविन लुईस, शेरफाने रुदरफोर्ड, शिमरॉन हेटमायर, केरी पिएरे, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, हेडन वॉल्श ज्युनियर, कीमो पॉल आणि केसरिक विलियम्स.

सामन्याची वेळ : संध्याकाळी ७ वाजल्यापासून.

Web Title: India vs West Indies third t20 match today in wankhade stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.