India vs West Indies: Sanju Samson in or out? India's predicted playing XI for second T20I   | India vs West Indies: संजू सॅमसनला संधी मिळणार की रिषभ पंत मर्जीत राहणार? अशी असेल टीम इंडिया 
India vs West Indies: संजू सॅमसनला संधी मिळणार की रिषभ पंत मर्जीत राहणार? अशी असेल टीम इंडिया 

भारत विरुद्ध  वेस्ट इंडिज यांच्यात आज दुसरा ट्वेंटी-20 सामना तिरुअनंतपूरम येथे होणार आहे. हा सामना जिंकून  मालिका खिशात घालण्याची संधी टीम इंडियाला आहे; त्यासाठी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातील चुका सुधारण्याचे आव्हानदेखील असेल. भारताने मागील 13 महिन्यांत विंडिज विरुद्ध 6 ट्वेंटी-20 सामने जिंकले. विराट कोहलीची नजर सलग सातव्या विजयावर असेल. पहिला सामना भारताने 6 विकेट्सनी जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी मिळविली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या दुसऱ्या ट्वेंटी-20त टीम इंडिया मालिका विजयाच्या निर्धारानेच मैदानावर उतरणार आहे. पण, आजच्या सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. वेस्ट इंडिजनं विजयासाठी ठेवलेलं 208 धावांचा लक्ष्य टीम इंडियानं 6 विकेट्स व 8 चेंडू राखून पार केलं. लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार विराट कोहलीनं तुफान फटकेबाजी करताना नाबाद 94 धावा चोपून भारताला विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 207 धावा केल्या. एव्हिन लुईसनं 17 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 40 धावांची खेळी केली. त्यानंतर ब्रेंडन किंग ( 31), शिमरोन हेटमायर ( 56) आणि किरॉन पोलार्ड ( 37) यांनी फटकेबाजी केली. जेसन होल्डरनही 9 चेंडूंत 24 धावा चोपल्या. युजवेंद्र चहलनं एकाच षटकात दोन धक्के देत विंडीजच्या धावगतीला चाप बसवला. 

त्यानंतर टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा (8) लगेच माघारी परतला. पण, राहुल व विराट यांनी शतकी भागीदारी केली. राहुलनं 40 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकार खेचून 62 धावा केल्या. त्यानंतर विराटनं सर्व सूत्र आपल्या हाती घेताना विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानं 50 चेंडूंत 6 चौकार व 6 षटकार खेचून नाबाद 94 धावा चोपल्या. या सामन्यात दीपक चहरने चार षटकांत 56 धावा दिल्या आणि त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्या जागी मोहम्मद शमीला संधी मिळू शकते. त्याव्यतिरिक्त संजू सॅमसनला अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरच्या जागी स्थान मिळू शकते.

असे असतील अंतिम 11

भारत - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे/वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी 

Web Title: India vs West Indies: Sanju Samson in or out? India's predicted playing XI for second T20I  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.