India vs West Indies, 2nd T20I: टीम इंडियाची ढिसाळ कामगिरी; वेस्ट इंडिजची मालिकेत बरोबरी

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा ट्वेंटी-20 सामना पाहुण्यांनी जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 10:28 PM2019-12-08T22:28:13+5:302019-12-08T22:28:43+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies, 2nd T20I: West Indies won by 8 wickets, level series by 1-1 | India vs West Indies, 2nd T20I: टीम इंडियाची ढिसाळ कामगिरी; वेस्ट इंडिजची मालिकेत बरोबरी

India vs West Indies, 2nd T20I: टीम इंडियाची ढिसाळ कामगिरी; वेस्ट इंडिजची मालिकेत बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा ट्वेंटी-20 सामना पाहुण्यांनी जिंकला. टीम इंडियाच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा विंडीजच्या फलंदाजांना मिळाला. त्यामुळे विंडीजनं दुसरा सामना जिंकून तीन सामन्यांची मालिका 1-1 अशा बरोबरीत आणली. लेंडल सिमन्सनं अर्धशतकी खेळी करताना विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. निकोलस पूरण, शिमरोन हेटमायर आणि एव्हिन लुइस यांनीही तुफान फटकेबाजी केली.

वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. शिवम दुबेनं पहिलं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील अर्धशतक झळकावताना आजचा दिवस गाजवला आणि त्यामुळे भारताला समाधानकारक पल्ला गाठता आला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा योग्य अंदाज बांधताना भारताच्या धावगतीवर वेसण घातले. विंडीजच्या केस्रीक विलियम्स आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. भारताने 20 षटकांत 7 बाद 170 धावांपर्यंत मजल मारली. शिवमने 30 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 54 धावा चोपल्या.


लेंडल सिमन्स आणि एव्हिन लुइस यांनी संयमी खेळ केला. त्यांना नशीबाचीही साथ लाभली. पाचव्या षटकात सिमन्सचा झेल वॉशिंग्टन सुंदरनं सोडला. भुवनेश्वर कुमारच्या त्याच षटकात लुइसचा झेल रिषभ पंतकडून सुटला. हा झेल थोडासा अवघड होता, परंतु रिषभनं पुरेपूर प्रयत्न केले. विंडीजनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता 41 धावा केल्या. त्यानंतर दोघांनी फटकेबाजी केली. वॉशिंग्टन सुंदरच्या अखेरच्या षटकात भारताला यश मिळालं. 10व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रिषभ पंतनं विंडीजच्या लुइसला यष्टिचीत केले. लुइस 35 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचून 40 धावांत तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या शिमरोन हेटमारयनं फटकेबाजी केली. त्यानं रवींद्र जडेजाच्या एका षटकात सलग दोन षटकार खेचले, परंतु तिसरा षटकार खेचण्याच्या नादात तो झेल देऊन माघारी परतला. विराटनं सुपर डाईव्ह मारताना त्याचा अप्रतिम झेल टिपला. हेटमायर 14 चेंडूंत 3 षटकारांसह 23 धावा करून माघारी परतला.

भुवनेश्वर कुमारनं टाकलेल्या 16व्या षटकात विंडीजच्या फलंदाजांनी 15 धावा जोडून सामन्याची बाजू त्यांच्याकडे झुकवली. सिमन्सनं 45 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 67 धावा केल्या, तर निकोलस पूरणनं 18 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचत नाबाद 38 धावा केल्या. विंडीजनं 8 विकेट व 9 चेंडू राखून विजय मिळवला. 







Web Title: India vs West Indies, 2nd T20I: West Indies won by 8 wickets, level series by 1-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.