ठळक मुद्देभारतीय संघानं तिसऱ्या वन डे सामन्यात १३ धावांनी मिळवला विजयऑस्ट्रेलियानं तीन सामन्यांची मालिका २-१नं जिंकलीहार्दिक पांड्या मॅन ऑफ दी मॅच, तर स्टीव्हन स्मिथ मॅन ऑफ दी सीरिज ठरला

India vs Australia, 3rd ODI :  भारतीय संघानं तिसऱ्या वन डे सामन्यात १३ धावांनी विजय मिळवताना ऑस्ट्रेलियाकडून मानहानिकाकर मालिका पराभव टाळला. हार्दिक पांड्यारवींद्र जडेजा यांनी १५० धावांची नाबाद भागीदारी करताना संघाला ३०२ धावांचा डोंगर उभा करून दिला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी दमदार खेळ करताना टीम इंडियाचे टेंशन वाढवले होते. पण, जसप्रीत बुमराहनं मोक्याच्या क्षणी मॅक्सवेलचा त्रिफळा उडवला आणि सामन्याला कलाटणी दिली. पराभवानंतरही ऑस्ट्रेलियानं ही मालिका २-१ अशी जिंकली. टीम इंडियानं या विजयासह ICC Cricket World Cup Super League  2020-22 स्पर्धेत गुणांचे खाते उघडले.

टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. पण, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार खेळताना टीम इंडियाला मोठा पल्ला गाठून दिला. ५ बाद १५२ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियासाठी पांड्या-जडेजा जोडी धावून आली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद १५० धावांची विक्रमी भागीदारी केली. विराट ७८ चेंडूंत ५ चौकारासह ६३ धावांवर माघारी परतला. टीम इंडियानं ५ बाद ३०२ धावा केल्या. हार्दिक ७६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ९२ धावांवर, तर रवींद्र ५० चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला.  

डेव्हिड वॉर्नरची अनुपस्थिती ऑस्ट्रेलियाला जाणवली. मार्नस लाबुशेनला मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार अॅरोन फिंचने ८२ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७५ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलनं सातव्या विकेटसाठी अॅश्टन अॅगरसह अर्धशतकी भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा जीवंत राखल्या होत्या. मॅक्सवेल ३८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांच्या मदतीनं ५९ धावांवर तंबूत परतला. हा सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला. अॅगर २८ धावांत माघारी परतला. नटराजननं पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात १०-१-७०-२ अशी कामगिरी केली. शार्दूल ठाकूर सर्वात यशस्वी ठरला. त्यानं १०-१-५१-३ अशी कामगिरी केली. भारतानं १३ धावांनी हा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ २८९ धावांत तंबूत परतला. 


टीम इंडियाचा हा ICC Cricket World Cup Super League मधील पहिलाच विजय ठरला. या विजयासह त्यांनी १० गुणांची कमाई करताना गुणतक्त्यात चौथे स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलिया ४० गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर इंग्लंड ३० आणि पाकिस्तान २० गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्या खात्यातही प्रत्येकी १० गुण आहेत.

काय आहे ही लीग?
इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात गतवर्षी झालेल्या वन डे मालिकेतून World Cup Super League ला सुरुवात झाली. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड चार, तर आयर्लंडनं एका गुणाची कमाई केली. आतापर्यंत World Cup Super League नुसार सहा संघांमध्ये मालिका झाली आहे. पाकिस्तान व झिम्बाब्वे हे अन्य दोन संघ आहेत. दरम्यान, टीम इंडियाला या गुणतक्त्यातील क्रमवारीचा फार फरक पडणार नाही. २०२३चा वर्ल्ड कप भारतात होणार असल्यानं यजमान म्हणून टीम इंडियानं आपलं स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे World Cup Super League च्या गुणतक्त्यातील अव्वल सात संघ २०२३च्या वर्ल्ड कप साठी पात्र ठरणार आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India vs Australia : India's First Win In ICC Cricket World Cup Super League 2020-22, jump on fourth spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.