ठळक मुद्देसलग दुसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडून पराभूतस्टीव्ह स्मिथचे सलग दुसरे शतक अन् अफलातूून झेलपॅट कमिन्स तीन, तर जोश हेझलवूड व अॅडम झम्पा प्रत्येकी दोन विकेट्स

India vs Australia, 2nd ODI : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजीची चिरफाड केली. पण, यावेळेस टीम इंडियाकडूनही त्यांना तोडीसतोड उत्तर दिले. विराट कोहली, लोकेश राहुलनं दमदार खेळ करताना भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या, परंतु टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही. शतकी खेळी करणाऱ्या स्टीव्हन स्मिथ ( Steven Smith) आणि मॉईजेस हेन्रीक्स यांनी घेतलेले अफलातून झेल, टीम इंडियाच्या पराभवाला हातभार लावणारे ठरले. हेन्रीक्सनं घेतलेला विराट कोहलीचा अफलातून झेल सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला. ऑस्ट्रेलियानं २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. 

वॉर्नर-फिंच जोडीनं पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. फिंचनं ६९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ६० धावा केल्या. वॉर्नर ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीनं ८३ धावा करून धावबाद होत माघारी परतला. स्मिथ व लाबुशेन यांनी मधल्या षटकांत केलेली खेळी मंत्रमुग्ध करणारी ठरली. त्यानं ६४ चेंडूंत १४ चौकार व २ षटकार खेचून तो १०४ धावांवर बाद झाला.  ग्लेन मॅक्सवेलची चौकार-षटकाराच्या आतषबाजीनं टीम इंडियाच्या गोलंदाजांना आणखी हतबल केलं. कशीही गोलंदाजी करा मॅक्सवेलनं अतरंगी फटक्यानं सडेतोड उत्तर दिले. लाबुशेन ६१ चेंडूंत ७० धावा करून माघारी परतला. मॅक्सवेलनं २९ चेंडूंत नाबाद ६३ धावा केल्या. ऑस्टेलियानं ४ बाद ३८९ धावा चोपल्या. 

प्रत्युत्तरात मयांक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी आक्रमक सुरुवात करून दिली, परंतु जोश हेझलवूड पुन्हा एकदा कर्दनकाळ ठरला. त्यानं ५८ धावांची ही भागीदारी तोडताना धवनला ( ३०) बाद केले. अग्रवालही  ( २८) पुढच्या षटकात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीचा शिकार ठरला.  विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. अय्यरला मोठी खेळी करण्याची हीच संधी होती, परंतु स्टीव्ह स्मिथनं अफलातून झेल घेत त्याला ( ३८) माघारी पाठवलं. विराट एकट्यानं खिंड लढवताना भारताच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. लोकेश राहुलनंही त्याला तुल्यबळ साथ देताना ७२ धावांची भागीदारी केली.

या खेळीदरम्यान विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ हजार धावा पुर्ण केल्या. ४१८व्या सामन्यात त्यानं हा पल्ला गाठला आणि २२००० धावा करणारा तो जगातला जलद फलंदाज ठरला. सचिन तेंडुलकरनं ४१८व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात २१००० धावांचा पल्ला सर केला होता. विराट आज शतकी खेळी करून टीम इंडियाला विजय मिळवून देईल, अशी सर्वांना आशा होती. पण, जोश हेझलवूडनं पुन्हा त्याला बाद केले. ऑस्ट्रेलियाला महत्त्वाची विकेट मिळवून देताना हेझलवूडनं सामना चुरशीचा बनवला. दुखापतग्रस्त मार्कस स्टॉयनिसच्या जागेवर खेळणाऱ्या हेन्रीक्सनं अफलातून झेल घेत विराटला माघारी पाठवले. विराटनं ८७ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ८९ धावा केल्या. 

लोकेश राहुल  व हार्दिक पांड्या संघाला विजय मिळवून देईल, असे वाटत होते. अॅडम झम्पानं ४४व्या षटकांत लोकेशला बाद करून भारताच्या विजयाचा मार्ग अधिक खडतर केला. राहुल ६६ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांसह ७६ धावा केल्या. पॅट कमिन्सनं ४७व्या षटकार रवींद्र जडेजाला ( २४) बाद केले. त्याच षटकात हार्दिकही २८ धावांवर माघारी परतला आणि टीम इंडियाचा पराभव निश्चित झाला. भारताला ९ बाद ३३८ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियानं हा सामना ५१ धावांनी जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India vs Australia : Australia win the second ODI by 51 runs and seal the series with a game to go, watch two super catch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.