ब्रिस्बेन: पहिल्या कसोटीत अवघ्या ३६ धावांत लोटांगण घालणाऱ्या, त्यानंतर दुखापतींनी ग्रासलेल्या, अनुनभवी खेळाडूंसह मैदानावर उतरलेल्या भारतीय संघानं शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करत इतिहास रचला आहे. शेवटच्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३२८ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पहिल्या कसोटीनंतर कर्णधार विराट कोहली माघारी परतल्यावर भारतीय संघ कमकुवत होईल, ०-४ नं पराभूत होईल, अशी भाकितं ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी केली होती. मात्र कर्णधार रहाणेच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ अजिंक्य राहिला.
ऍडलेडमध्ये मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासलं. मात्र त्यानंतरही भारतीय संघानं कणखरपणा दाखवला. दुसऱ्या कसोटीत विजय आणि तिसरी कसोटी अनिर्णित राखून भारतीय संघ चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला पोहोचला. गॅबाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघ गेल्या ३२ वर्षांत एकदाही पराभूत झालेला नाही आणि भारतीय संघ या मैदानात कधीही जिंकलेला नाही, असा इतिहास. मात्र रहाणेच्या संघानं कांगारुंना धूळ चारत नवा इतिहास लिहिला.
भारतानं ब्रिस्बेनमध्ये पहिलावहिला कसोटी विजय मिळवत मालिका खिशात घातल्यावर आयसीसीनं केलेलं एक ट्विट लक्षवेधी ठरलं आहे. ऑस्ट्रेलियन संघानं ब्रिस्बेनमध्ये शेवटचा पराभव पाहिला, त्यावेळी सचिन तेंडुलकरनं कसोटी पदार्पण केलेलं नव्हतं. त्याच्या पदार्पणाला वर्ष बाकी होतं.
विराट कोहली अवघ्या १६ दिवसांचा होता, असं आयसीसीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. कारण ऑस्ट्रेलियन संघ १९८८ पासून ब्रिस्बेनमध्ये अपराजित होता. १९८८ मध्ये वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेनमध्ये नमवलं. तेव्हापासून ब्रिस्बेन हा ऑस्ट्रेलियाचा भक्कम किल्ला होता.
ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेनमधील पराभव आणि कोहली कुटुंब यांच्या घरात हलणारा पाळणा असा एक आगळावेगळा योगायोग पाहायला मिळाला आहे. विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी नवी दिल्लीत झाला. विराटच्या जन्मानंतर १६ दिवसांनी ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेनमध्ये विंडीजच्या संघाकडून पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर तब्बल ३२ वर्ष ऑस्ट्रेलियन संघ ब्रिस्बेनमध्ये हरला नाही. आता कोहलींच्या घरी पाळणा हलल्यानंतर, विराटला कन्यारत्न झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेनमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. विराट आणि अनुष्काला ११ जानेवारीला मुलगी झाली. कोहलींच्या घरी पाळणा हलल्यानंतर ८ दिवसांनंतर ऑस्ट्रेलियन संघ ब्रिस्बेनच्या मैदातान पराभूत झाला.