India tour of Australia: 'Weight issues' could keep Rishabh Pant out of national squad - Report | India tour of Australia : वाढला पोटाचा घेर; रिषभ पंत जाणार टीम इंडियातून बाहेर?

India tour of Australia : वाढला पोटाचा घेर; रिषभ पंत जाणार टीम इंडियातून बाहेर?

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वानंतर टीम इंडिया UAEतून थेट ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. निवड समिती प्रमुख सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्याकडून अद्याप अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही, परंतु या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा जम्बो संघ पाठवण्याची तयारी बीसीसीआयनं दर्शवली आहे. पण, या दौऱ्यावर रिषभ पंतचा  ( Rishabh Pant) पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याला कारण आहे ते त्याचा पोटाचा वाढलेला घेर...

निवड समितीच्या बैठकीत रिषभ पंत, शुबमन गिल, पृथ्वी शॉ आणि हार्दिक पांड्या यांच्याबाबत अधिक चर्चा होणार आहे. गिल वन डे संघातील स्थान गमावू शकतो, तर पृथ्वीची निवड केवळ कसोटी संघासाठी केली जाऊ शकतो. पांड्या गोलंदाजी करताना दिसत नाही, त्यामुळे ट्वेंटी-20 क्रिकेटसाठीच त्याचा विचार केला जाऊ शकतो. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार रिषभ या दौऱ्यालाच मुकण्याची शक्यता आहे. त्याची फिटनेस हवी तशी नाही आणि त्याचं वजन वाढलेलं दिसत आहे, त्यामुळे निवड समिती त्याच्या नावावर काट मारू शकते.

तंदुरूस्ती राखणे, Yo-Yo चाचणीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि त्यामुळे या दौऱ्यासाठी निवडण्यात येणाऱ्या संघात अनेक खेळाडूंना डच्चू दिला जाऊ शकतो. ''काही दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या फिटनेस ट्रेनरनी पंतच्या तंदुरुस्तीबाबत त्यांचं मत मांडलं आणि त्याचं वाढलेलं वजन आम्हा सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवडण्यापूर्वी निवड समिती पंतच्या तंदुरुस्तीवरची चर्चा करतील,''असे सूत्रांनी सांगितले. 

रिषभ पंतचा पत्ता कट झाल्यास लोकेश राहुलचा वन डे व ट्वेंटी-20 संघात यष्टिरक्षक म्हणून विचार केला जाऊ शकतो. कसोटीत वृद्धीमान सहा हा पर्याय आहेच. भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रिषभनं सात डावांत ३५० धावा केल्या होत्या आणि भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज होता. दरम्यान, इशांत शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांना दुखापतीमुळे या दौऱ्याला मुकावे लागेल.

भारतच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं संभाव्य वेळापत्रक-

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India tour of Australia: 'Weight issues' could keep Rishabh Pant out of national squad - Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.