एसीसी मेन्स आशिया कप 'रायझिंग स्टार्स'क्रिकेट स्पर्धेत आज भारत 'ए' आणि पाकिस्तान 'शाहीन्स' यांच्यात सुरू असलेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताची अत्यंत खराब सुरुवात झाली आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला पाकिस्तानच्या धारदार गोलंदाजीसमोर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले आहे.
ताजी माहिती हाती येईपर्यंत भारतीय संघाने आपले महत्त्वाचे ८ फलंदाज गमावले आहेत. या संघात आयपीएलमध्ये चमक दाखवणारे जितेश शर्मा आणि रमनदीप सिंह (Ramandeep Singh) यांसारखे खेळाडू असूनही, पाकिस्तानच्या युवा गोलंदाजांनी त्यांच्यावर सुरुवातीपासूनच दबाव कायम ठेवला. प्रियांश आर्य आणि वैभव सूर्यवंशी यांनी डावाची सुरुवात केली. चौथ्या षटकात आर्य १० धावांवर बाद झाला. पाच षटकांनंतर भारताची धावसंख्या ४०-१ होती. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि नमन धीर यांनी डाव सावरला. परंतू, नवव्या षटकात भारताला दुसरा धक्का बसला जेव्हा नमन धीर २० चेंडूत ३५ धावांवर बाद झाला. दहाव्या षटकात वैभव सूर्यवंशी बाद झाला. त्याने २८ चेंडूत ४५ धावा केल्या होत्या. यामध्ये पाच चौकार आणि तीन षटकार होते. त्यानंतर १३ व्या आणि १४ व्या षटकात भारताला दोन धक्के बसले. प्रथम जितेश शर्मा पाच धावांवर बाद झाला, त्यानंतर १४ व्या षटकात आशुतोष. १५ व्या षटकात नेहल वधेरा आठ धावांवर बाद झाला.
भारतीय संघ १३६ धावांवर सर्वबाद झाला आहे. पाकिस्तानसमोर २० षटकांत १३७ धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे.
सूर्यवंशीच्या कामगिरीवर लक्ष:
या सामन्यात बिहारचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याच्यावर विशेष लक्ष होते. त्याने यापूर्वीच्या सामन्यात यूएईविरुद्ध १४४ धावांची धडाकेबाज खेळी केली होती, तसेच टी-२० मध्ये ३५ हून कमी चेंडूंमध्ये दोन शतके ठोकण्याचा अनोखा विक्रमही त्याच्या नावावर आहे. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताच्या प्रमुख फलंदाजांना मोठी खेळी करता आलेली नाही.
नसीम शाहचा भाऊ मैदानात
पाकिस्तान 'शाहीन्स'च्या संघात युवा वेगवान गोलंदाज उबैद शाहचा समावेश आहे, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जलदगती गोलंदाज नसीम शाहचा लहान भाऊ आहे. या स्पर्धेत भारताने आपला पहिला सामना यूएईला १४८ धावांनी हरवून जिंकला होता, परंतु आजच्या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.