ठळक मुद्देइशांत शर्मा हा १०० कसोटी सामने खेळणारा भारताचा कपिल देव यांच्यानंतरचा दुसरा वेगवान गोलंदाज ठरणारकारकीर्दीत मिळालेल्या यशासाठी इशांत शर्माने झहीर खानचा विशेष उल्लेख केलाइशांत शर्माने बांगलादेशविरुद्ध वयाच्या १८ व्या वर्षी राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते
अहमदाबाद - भारत आणि इंग्लंडच्या (IND vs ENG 3rd Test) संघामध्ये खेळवला जाणारा तिसरा कसोटी सामना भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मासाठी (Ishant Sharma) सर्वार्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. हा सामना इशांत शर्माचा १०० वा कसोटी सामना ठरणार आहे. याबरोबरच इशांत शर्मा हा १०० कसोटी सामने खेळणारा भारताचा कपिल देव (Kapil Dev) यांच्यानंतरचा दुसरा वेगवान गोलंदाज ठरणार आहे. दरम्यान, १०० व्या कसोटी सामन्यापूर्वी इशांत शर्मा भावूक झाला असून, त्याने आपल्या कारकीर्दीतील आठवणींना उजाळा दिला आहे. (Ishant Sharma became emotional before the 100th Test match. Special thanks to Zaheer Khan)
माझी कसोटी कारकीर्द एवढी दीर्घकाळ चालली याचं कारण म्हणजे कर्णधाराला काय अपेक्षित आहे हे मला नेमके कळते, असे इशांतने सांगितले. तसेच कारकीर्दीत मिळालेल्या यशासाठी झहीर खानचा विशेष उल्लेख केला. इशांत म्हणाला, मी झहीर खानकडून खूप काही शिकतो. मी त्याच्या मेहनतीमधून शिकलो आहे. जर तुम्ही तुमच्या फिटनेसवर लक्ष दिले तर तुम्हाला त्याचे फळ मिळेल, असे मी संघातून खेळणाऱ्यांना सांगतो.
इशांत शर्माने बांगलादेशविरुद्ध वयाच्या १८ व्या वर्षी राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर इशांत अनिल कुंबळे, महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रिकेट खेळला आहे. आता अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध होणारी तिसरी कसोटी हा इशांतचा कसोटी कारकीर्दीतील १०० वा सामना ठरणार आहे.
एकदिवसीय आणि टी-२० संघात समावेश नसल्याने कसोटी कारकीर्द लांबली का, असे विचारले असता इशांत म्हणाला की, मी या शापाकडे वरदानासारखे पाहतो. मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळायचे नव्हते, असे नाही. मात्र जेव्हा खेळायची संधी मिळाली नाही. तेव्हा मी सराव चालू ठेवला. एकदिवसीय संघात स्थान न मिळाल्याने कसोटी क्रिकेटमधील कामगिरीवर परिणाम होऊ नये यासाठी मी खबरदारी घेत होतो. क्रिकेटच्या किमान एका प्रकारात मला खेळता आले यासाठी मी समाधानी आहे.
मात्र क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळलो असतो तर १०० कसोटी खेळता आल्या नसत्या ही शक्यता इशांतने फेटाळून लावली आहे. जर तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळलो असतो तर १०० कसोटी सामने खेळता आले नसते असे मला वाटत नाही. कदाचित थोडा अधिक वेळ लागला असता. मी सध्या ३२ वर्षांचा आहे. ४२ वर्षांचा नाही, असे त्याने स्पष्ट केले. मात्र कपिल देव यांच्या १३१ कसोटींचा विक्रम गाठण्यासाठी वेळ लागेल. मी सध्या कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. हा सामना माझ्यासाठी विश्वचषकासारखा आहे आणि त्याला जिंकून एकदिवसीय विश्वचषक जिंकल्याचा अनुभव मला घ्यायचा आहे.
जेम्स अँडरसन ३८ व्या वर्षीही क्रिकेट खेळतोय. याबाबत विचारले असता इशांत म्हणाला, सध्या मी एकावेळी एकाच सामन्याचा विचार करतोय. तुम्हाला माहिती नाही की, पुढे काय होईल. सध्या मी रिकव्हरीच्या बाबतीत अधिक व्यावसायिक झालो आहे. पूर्वी मी खूप सराव करतो. मात्र रिकव्हरीवर लक्ष देत नसे. वयासोबत शरीरावर लक्ष देणे गरजेचे आहे.