भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी यजमान इंग्लंडच्या संघानं ४ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर २५१ धावा लावल्या आहेत. जो रुट शतकापासून एक धाव दूर असून बेन स्टोक्सही सेट झाला आहे. ही परिस्थिती इंग्लंडचा संघ चांगल्या परिस्थितीत असल्याचे वाटतं असले तरी पहिल्या दिवशी भारतीय संघ इंग्लंडवर भारी पडलाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या दिवशी इंग्लंडपेक्षा टीम इंडियाच भारी, कारण...
यामागचं कारण 'बॅझबॉल' लव्हर्स संघाला टीम इंडियाने 'कासव छाप' खेळी करण्यास भाग पाडलंय. एवढेच नाही तर इंग्लडच्या संघाने नाणेफेक जिंकून या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या दोन कसोटी सामन्यात टीम इंडियाचे तेवर बघितल्यावर इंग्लंडच्या संघाने आपला नवा तोरा दाखवण्यापेक्षा कसोटीचा जुना पाढा बरा असाच काहीसा पवित्रा घेतल्याचे दिसून आले. ही गोष्ट टीम इंडियाने इंग्लंडवर मानसिक दबाव निर्माण करण्यात यश मिळवल्याचे चित्र निर्माण करणारी आहे.
IND vs ENG : बुमराहच्या गोलंदाजीवर टीम इंडियालाच बसला धक्का; पंत 'आउट'! नेमकं काय घडलंं?
बॅझबॉलचा छंद जोपसणाऱ्या इंग्लंडची 'कासव छाप' खेळी, आकडेवारी त्याचा पुरावा
इंग्लंडच्या संघाने बॅझबॉलचा छंद जोपसल्यापासून बहुतांश वेळा इंग्लंडचा संघ हा पहिल्यांदा फलंदाजी करण्यापेक्षा धावांचा पाठलाग करण्याला पसंती देतो. पण टीम इंडियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लॉर्ड्सच्या मैदानात पहिल्या दिवशी केलेल्या २५० धावा ही इंग्लंडच्या संघाने बॅझबॉल जमान्यात ७० पेक्षा अधिक षटके खेळल्यावर एका दिवसात केलेली आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी २०२४ मध्ये रांची कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंडच्या संघाने ३०२ धावा केल्याचा रेकॉर्ड होता. २०२३ मध्ये मँचेस्टरच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या दिवशी ३०४ आणि २०२४ मध्ये टीम इंडियाविरुद्ध हैदराबादच्या मैदानात तिसऱ्या दिवसाच्या खेळात एका दिवसात ३१६ धावा काढल्याचा रेकॉर्ड आहे.
रुट शतकाच्या उंबरठ्यावर! टीम इंडियाकडून नितीश कुमार रेड्डीनं घेतल्या २ विकेट्स
पहिल्या दिवसाच्या खेळात इंग्लंडच्या संघाने झॅक क्रॉउली १८ (४३) आणि बेन डकेट २३ (४०) या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या. या दोघांना नितीश कुमार रेड्डीनं तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर जो रुट आणि ओली पोप या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची दमदार भागीदारी रचली. रवींद्र जडेजाने सेट झालेल्या ओली पोपला ४४ धावांवर चालते केले. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या हॅरी ब्रूकला जसप्रीत बुमराहने अवघ्या ११ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. इंग्लंडच्या संघाने १७२ धावांवर चार विकेट्स गमावल्या होत्या. पहिल्या दिवसाच्या अखेरीस कर्णधार बेन स्टोक्स आणि जो रुट जोडीनं पाचव्या विकेट्साठी ८३ धावांची भागीदारी रचत संघाच्या धावफलकावर ४ बाद २५१ धावा लावल्या होत्या. जो रूट १९१ चेंडूत ९९ धावांवर नाबाद खेळत होता. दुसऱ्या बाजूला बेन स्टोक्सनं १०२ चेंडूचा सामना करून नाबाद ३९ धावा काढल्या होत्या.
Web Title: IND vs ENG 3rd England Finishes On 248 Off 4 At Day 1 Stumps Joe Root Unbeaten On 99
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.