icc world cup 2019 Rift Between virat Kohli and Rohit Sharma Factions | भारतीय संघात दुही?; विराट-रोहितमध्ये निर्णय प्रक्रियेवरुन मतभेद
भारतीय संघात दुही?; विराट-रोहितमध्ये निर्णय प्रक्रियेवरुन मतभेद

नवी दिल्ली: विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यामुळे भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं. यामुळे क्रिकेट चाहते निराश झाले असताना टीम इंडियात गटबाजी होत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात अनेक निर्णयांवरुन मतभेद असल्याचं वृत्त हिंदी दैनिक 'जागरण'नं दिलं आहे. टीम इंडियामध्ये सारं काही आलबेल नसून गटबाजी सुरू असल्याचं जागरणनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. 

कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या एककल्ली कारभारावर आणि संघ निवडीवर काही खेळाडू नाराज होते. संघाला विश्वासात न घेता कोहली आणि शास्त्रींनी निर्णय घेतले. यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरणावर आणि संघातील एकीवर परिणाम झाल्याचं वृत्तात म्हटलं आहे. संघात विराट आणि रोहित असे दोन गट पडले आहेत. विराटच्या गटातील खेळाडूंना सर्वाधिक संधी दिली जाते, संघ निवड करताना पक्षपात केला जातो, असा दावा करताना टीम इंडियातील चौथ्या क्रमांकाचा दाखला देण्यात आला आहे. चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरची निवड करण्यात आली. त्यासाठी अंबाती रायुडूला डावलण्यात आलं, असं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. 

विश्वचषक स्पर्धेदरम्यान संघाची निवड करताना मोठ्या प्रमाणात गटबाजी करण्यात आली. रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहची कामगिरी उत्तम असल्यानं त्यांना वगळणं शक्य नव्हतं. मात्र 'विराट कंपनी'ला संधी देण्यासाठी अनेकांना डावलण्यात आलं. सातत्यानं अपयशी ठरत असूनही संघ व्यवस्थापन के. एल. राहुलच्या पाठिशी उभं राहिल्याचं 'जागरण'नं भारतीय संघातील एका खेळाडूच्या हवाल्यानं म्हटलं आहे. कुलदीप यादवऐवजी अनेकदा युझवेंद्र चहलला संधी देण्यात आली. चहल आयपीएलमध्ये विराटच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळतो. 
 

Web Title: icc world cup 2019 Rift Between virat Kohli and Rohit Sharma Factions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.