I dont think IPL 2021 will be MS Dhonis last says CSK CEO Kasi Viswanathan | IPL 2021: धोनी अखेरची आयपीएल खेळतोय? CSKच्या CEOनी स्पष्टच सांगितलं

IPL 2021: धोनी अखेरची आयपीएल खेळतोय? CSKच्या CEOनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मागच्यावर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तेव्हापासून धोनीने स्वत:ला आयपीएलपुरते मर्यादित ठेवले आहे. यूएईत १३व्या पर्वात स्वत: धोनी आणि त्याच्या सीएसकेची कमगिरी ‘फ्लॉप’ ठरली. यंदा तो आणि त्याचा संघ कशी झेप घेतो, हे पाहणे चाहत्यांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.

शुक्रवारी सुरू झालेल्या १४व्या पर्वात आज शनिवारी सीएसकेचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. धोनी दोन वर्षांपासून क्रिकेटपासून दूर असल्यामुळे तसेच वाढत्या वयासोबत त्याच्याकडून पूर्वीसारखी कामगिरी होताना दिसत नाही. यामुळेच धोनीची अखेरची आयपीएल असेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी मत मांडले. ते म्हणाले, ‘धोनीचे हे अखेरचे आयपीएल असेल,असे मला वाटत नाही. आम्ही सध्यातरी धोनीच्या पुढे कुणाकडेही पाहात नाही.’ गेल्यावर्षी चेन्नईची कामगिरी खराब झाली होती. त्यानंतर धोनीने खेळाडूंना काही सूचना केल्या का, या प्रश्नाच्या उत्तरात काशी म्हणाले,‘ नाही. गेल्या वर्षी काही महत्त्वाचे खेळाडू संघात नव्हते. दोघांना करोना झाला होता. या गोष्टी आमच्या हातात नव्हत्या. आता संघ चांगल्या स्थितीत आहे. खेळाडू १५-२० दिवस झाले सराव करत आहेत. आम्हाला आमच्या प्रक्रियेवर विश्वास आहे. ’

धोनी २००८ पासून चेन्नई संघाचे नेतृत्व करीत आहे. त्याच्या नेतृत्वात सीएसकेने तीनवेळा विजेतेपद मिळवले होते. धोनीने १७४ पैकी १०५ सामन्यात विजय मिळवला आहे. त्याने चेन्नईला विक्रमी आठ वेळा अंतिम फेरी गाठून दिली. २०२० च्या पर्वातही हा संघ प्रथमच प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: I dont think IPL 2021 will be MS Dhonis last says CSK CEO Kasi Viswanathan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.