विश्व कसोटी फायनलचे ‘विराट’ लक्ष्य

खेळापेक्षा खेळपट्टीची उत्सुकता; आजपासून भारत-इंग्लंड चौथा कसोटी सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 04:41 AM2021-03-04T04:41:31+5:302021-03-04T04:42:29+5:30

whatsapp join usJoin us
The 'huge' goal of the World Test final | विश्व कसोटी फायनलचे ‘विराट’ लक्ष्य

विश्व कसोटी फायनलचे ‘विराट’ लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अहमदाबाद : भारतीय संघ गुरुवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याच्या निर्धाराने खेळेल. दुसरीकडे, इंग्लंड संघ विजय मिळवत भारताला धक्का देण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे, अखेरच्या कसोटी सामन्यासाठी कशाप्रकारची खेळपट्टी समोर येईल आणि हा सामना किती दिवस रंगणार याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे.


 नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार असून याआधीचा तिसरा कसोटी सामनाही याच स्टेडियमवर झाला होता. अवघ्या दोन दिवसांत संपलेल्या या सामन्यात भारताने इंग्लंडला सहज नमवले होते. त्यामुळेच, या खेळपट्टीचा जणू धसकाच इंग्लंड संघाने घेतला आहे. पुन्हा एकदा फिरकीला पोषक खेळपट्टी तयार करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच अखेरच्या कसोटी सामन्यात प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आल्याने इंग्लंडने फिरकी खेळपट्टीच गृहीत धरली आहे.


 इंग्लंडपुढे या सामन्यात प्रमुख आव्हान असेल ते अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या फिरकी द्वयीचे. या दोघांच्या सरळ टप्पा पडणाऱ्या चेंडूंनी इंग्लंड फलंदाजांना घाम फोडला होता. मात्र, आता पुन्हा एकदा सामना लाल चेंडूने होणार असल्याने सामन्याचे पारडेही समान राहणार असल्याचे मानले जात आहे. गुलाबी चेंडूच्या तुलनेत लाल चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगान आत येत नसल्याने दोन्ही संघांमध्ये कडवी टक्कर पाहण्याची संधी चाहत्यांना मिळेल, असा विश्वास दोन्ही संघांनी व्यक्त केला आहे.

भारताच्या तंबूमधून...
n फलंदाजीमध्ये भारताकडून आतापर्यंत रोहित शर्माने छाप पाडली आहे. फिरकीसाठी पोषक खेळपट्टीवर रोहितचा अपवाद वगळता अन्य भारतीय फलंदाज कोलमडले. मालिकेत भारताचा यशस्वी फलंदाज म्हणून रोहित ठरला असून त्याने आतापर्यंत २९६ धावा केल्या आहेत. रविचंद्रन अश्विन १७६ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत दोन अर्धशतकी खेळी केल्या असल्या तरी त्याचा लौकिक पाहता भारतासाठी हे अपयशच आहे. त्याचवेळी, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, शुभमान गिल यांनाही म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही.
n गोलंदाजीत भारत बुमराहविना खेळेल. त्याची जागा उमेश यादव भरेल, असे दिसतेय. त्याचवेळी, त्याच्यासोबत इशांत शर्मा असेल की मोहम्मद सिराज याकडेही लक्ष लागले आहे.\

इंग्लंडच्या तंबूमधून...
n कर्णधार जो रुट याचा अपवाद वगळता इंग्लंडकडून कोणताही फलंदाज चमकलेला नाही. रुटने एका द्विशतकासह सर्वाधिक ३३३ धावा केल्या असून अष्टपैलू बेन स्टोक्स १४६ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. या दोघांमध्ये तब्बल १८७ धावांचे अंतर आहे. रुटने गोलंदाजीतही कमाल केली असून तिसऱ्या कसोटीत त्याने भारताचे ५ बळी केवळ ८ धावांत घेतले.
n गोलंदाजीत इंग्लंडसाठी जॅक लीच हुकमी एक्का ठरत आहे. फिरकी खेळपट्टी पाहता इंग्लंड लीचसह आणखी एक फिरकी गोलंदाज घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉम बेसचे अंतिम संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. चेन्नई येथे पहिल्या कसोटीत बेसने चांगली कामगिरी केलेली.

भारतासाठी     सामना महत्त्वाचा!
हा सामना इंग्लंडच्या तुलनेत भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, या सामन्यातील निकालावर भारताची पुढील वाटचाल अवलंबून आहे. हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवून प्रतिष्ठा जपण्याच्या निर्धाराने इंग्लंड खेळेल. दुसरीकडे, भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत पराभव टाळायचा आहे. सामना अनिर्णित राखण्यात भारताला यश आले तरी, भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश आणि मालिका विजय साकारला जाईल.

लक्ष्य अंतिम सामन्याचे!
भारत सध्या मालिकेत २-१ असा आघाडीवर आहे. त्यामुळे जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारताला चौथा कसोटी सामना किमान अनिर्णित राखणे आवश्यक आहे. मात्र, कर्णधार कोहलीचे आक्रमक नेतृत्व पाहता भारतीय संघ जिंकण्याच्या निर्धारानेच खेळेल, हे नक्की आहे. इंग्लंड संघ याआधीच अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. मात्र, जर ते भारताला पराभूत करण्यात यशस्वी ठरले, तर अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया खेळेल.

Web Title: The 'huge' goal of the World Test final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.