Great to be compared to Dhoni after historic victory; I want to earn my name - Pant | ऐतिहासिक विजयानंतर धोनीसोबत तुलना होणे शानदार; मला माझे नाव कमवायचे आहे - पंत

ऐतिहासिक विजयानंतर धोनीसोबत तुलना होणे शानदार; मला माझे नाव कमवायचे आहे - पंत

नवी दिल्ली : ‘दिग्गज यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीसोबत तुलना होणे शानदार असले तरी मला स्वत:ला माझे नाव कमवायचे आहे.’ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका विजयानंतर भारतीय संघाचा यष्टिरक्षक - फलंदाज ऋषभ पंतवर याने मायदेशी परतताच ही प्रतिक्रिया दिली आहे. अखेरच्या कसोटीत मोलाची कामगिरी करणाऱ्या पंतची तुलना महेंद्रसिंह धोनीसोबत केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंतने पत्रकारांशी संवाद साधला.

एरव्ही टीकेचा धनी झालेल्या ऋषभने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. पहिल्या कसोटी सामन्यात वगळण्यात आल्यानंतर पंतने मेलबोर्नमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देत छाप सोडली. तिसऱ्या सामन्यातही ऋषभने तुफान फटकेबाजी करीत ९७ धावा केल्या होत्या.

ब्रिस्बेन कसोटीत पंत विजयाचा शिलेदार ठरला. दुखापतीतून सावरलेल्या पंतने शेवटच्या दिवशी ८९ धावा ठोकून विजय मिळवून दिला. या विजय़ी खेळीची तुलना महेंद्रसिंह धोनी, गिलख्रिस्ट आणि मार्क बाऊचर यांच्यासोबत होत आहे. याविषयी पंत म्हणाला, ‘धोनीसारख्या खेळाडूसोबत तुलना होणे फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यासोबत तुलना झाल्याने खूप चांगले वाटते; पण माझी तुलना कोणासोबत व्हावी अशी इच्छा नाही. मला माझे नाव कमवायचे आहे. त्यावर माझे संपूर्ण लक्ष आहे. एका नवख्या खेळाडूची तुलना महान खेळाडू सोबत होणे योग्य नाही.’

दरम्यान, आयसीसी टेस्ट क्रमवारीत ऋषभ पंत १३ व्या क्रमांकावर पोहोचला असून यासंबंधी विचारण्यात आले असता, तो म्हणाला, ‘चांगले वाटते; पण मला त्याबद्दल फार काही माहिती नाही. भारतासाठी सामने जिंकणे एवढेच माझे काम आहे.’

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Great to be compared to Dhoni after historic victory; I want to earn my name - Pant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.