आधी हिसकावले नेतृत्व, आता बनविले ‘वॉटरबॉय’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 12:12 AM2021-05-04T00:12:36+5:302021-05-04T00:13:07+5:30

डेव्हिड वॉर्नरच्या गच्छंतीवर चाहते क्षुब्ध

First snatched leadership, now made ‘Waterboy’! | आधी हिसकावले नेतृत्व, आता बनविले ‘वॉटरबॉय’!

आधी हिसकावले नेतृत्व, आता बनविले ‘वॉटरबॉय’!

Next

नवी दिल्ली : एक दिवसआधी डेव्हिड वॉर्नरची सनरायझर्स हैदराबाद संघाच्या नेतृत्वपदावरून उचलबांगडी करण्यात आली. संघाचे नेतृत्व केन विलियम्सनकडे सोपविण्यात आले. वाॅर्नरच्या नेतृत्वात यंदा संघाने सहापैकी पाच सामने गमावले. वॉर्नरला आता संघातदेखील स्थान मिळाले नाही. या खेळाडूचा उत्साह मात्र कमी झाला नाही. तो सहकाऱ्यांसाठी चक्क ‘वॉटरबॉय’ बनला. काल विलियम्सनच्या नेतृत्वातही सनरायझर्सने सामना गमावला. या सामन्यात वाॅर्नरला डच्यू देण्यात आला. रॉयलचे फलंदाज तुफानी फटकेबाजी करीत असताना बाकावर बसलेला वॉर्नर सारखा अस्वस्थ होता. त्याची छायाचित्रेदेखील व्हायरल झाली आहेत. 

सामन्यादरम्यान तो सीमारेषेवर बसून ड्रिंक्ससह सहकाऱ्यांसाठी बॅट टॉवेल, पाणी, हेल्मेट आदी घेऊन जाताना दिसला. खराब फॉर्ममुळे फ्रँचायझीने  संघाबाहेर बसविण्याची वॉर्नरच्या आयपीएल करिअरमधील ही पहिली वेळ असावी. मनीष पांडेला बाहेर बसविण्याच्या निर्णयावर भाष्य करणे वॉर्नरला भोवले, अशी चर्चा आहे. वॉर्नरचे वक्तव्य फ्रँचायझीच्या निर्णयाला छेद देणारे असल्याची भावना झाल्यामुळेच वॉर्नरची उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जाते.
२०१८ आणि २०१९ च्या पर्वात त्याने संघाचे नेतृत्व केले होते. केपटाऊन येथे चेंडू कुरतडण्याच्या आरोपाखाली वर्षभराची बंदी लागण्यापूर्वीच त्याला संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. वॉर्नरने २०१६ च्या आयपीएलमध्ये संघाला स्वत:च्या नेतृत्वात जेतेपददेखील मिळवून दिले होते.
 

स्टीव्ह वॉर्नरची टीका
आक्रमक फलंदाज असलेला डेव्हिड वॉर्नर याला रविवारच्या सामन्यातून बाहेर बसविल्याबद्दल चाहत्यांसोबतच डेव्हिडचा भाऊ स्टीव्ह वॉर्नर याने सनरायझर्सवर सडकून टीका केली. स्वत:चा राग व्यक्त करताना स्टीव्ह म्हणाला, ‘सलामी जोडी तुमच्या चिंतेचे कारण नाहीच, मधल्या फळीने धावा काढायला हव्या. इतकी वर्षे संघाला सांभाळणाऱ्या खेळाडूला कसे काय बाहेर काढू शकता? सलामीवीरांना बाहेर बसविण्याऐवजी मधल्या फळीत धावा वाढवू शकतील असे फलंदाज तयार करा!’

वॉर्नरचे हे अखेरचे सत्र ठरावे : स्टेन
सनरायझर्सच्या संघ व्यवस्थापनाने डेव्हिड वॉर्नरला दिलेली वागणूक पाहून द. आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन यानेदेखील प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला, ‘शक्यतो डेव्हिडचे आयपीएलमधील हे अखेरचे सत्र असावे. डेव्हिडने या निर्णयाचे काही उत्तर दिले का, हे माहिती नाही. मनीष पांडे याला बाहेर बसविण्याचा निर्णय आपला नव्हता, असे डेव्हिडने जे भाष्य केले ते फ्रँचायझीला रुचले नसावे.’

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: First snatched leadership, now made ‘Waterboy’!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app