Dhoni's name is discussed in the team equation | संघाच्या समीकरणात धोनीच्या नावाची चर्चा
संघाच्या समीकरणात धोनीच्या नावाची चर्चा

- अयाझ मेमन
महेंद्रसिंग धोनी जुलै महिन्यात विश्व चषक संपल्यानंतर एकाही सामन्यात खेळलेला नाही. त्याने त्याचे विकेटकिपिंग ग्लोव्ह्जदेखील घातलेले नाहीत. मात्र, टी-२० विश्वचषक चॅम्पियनशिपसाठी पुन्हा एकदा क्रिकेट वर्तुळात त्याच्या नावाची चर्चा होत आहे.
या मालिकेत रिषभ पंत ज्या पद्धतीने अडखळत आहे. त्याची ही पद्धत धोनीच्या निवृत्तीच्या वाटेत आडवी आली की, ज्यामुळे पुन्हा एकदा धोनीकडे लक्ष वेधले गेले.
पंत हा सातत्याने चुका करीत आहे. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानाबाबत निवडकर्त्यांनादेखील एक पाऊल मागे यावे लागू शकते. असे असले तरी मुख्य निवडकर्ते एम. एस. के. प्रसाद यांनी म्हटले आहे की, ‘यष्टिरक्षक म्हणून त्यांची पहिली पसंती पंतलाच आहे.’ नंतर प्रसाद यांनी म्हटले होते की, निवड समिती आता धोनीच्या पुढे गेली आहे.
पंत यष्टीच्या मागे किती चांगली कामगिरी करतो, हे यामागचे मुख्य कारण होते. तो फलंदाजीत चांगला वाटत असला तरी विश्वचषकात त्याने किती फलंदाजी केली आहे. हे आपण सर्वांनीच पाहिले आहे. त्याची यष्टीमागील कामगिरी हा देखील चिंतेचा विषय आहे.
त्याने आधीच कसोटीतील त्याचे स्थान गमावले आहे. वृद्धिमान साहा याची कसोटीसाठी निवड झाली आहे. केरळचा यष्टिरक्षक संजू सॅमसन याचीदेखील संघात निवड झाली आहे. त्यामुळे पंतसाठी चिंतेचा विषय आहे. सॅमसन स्थिर खेळाडू आहे. त्यामुळे पंतला धोका आहे. तो एकमेव धोका नाही. तर अनेक युवा यष्टिरक्षक - फलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत.
ईशान किशन आणि श्रीकर भरत या दोघांची नावे चर्चेत आहेत. तसेच के. एल. राहुलदेखील या भूमिकेत दिसू शकतो. एवढे युवा यष्टिरक्षक असतानाही ३८ वर्षांच्या धोनीच्या नावाची चर्चा का होते? हे कोण विचारू शकेल. टी-२०मध्ये भारत क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. २००७ नंतर भारताला या प्रकारात विजेतेपद मिळालेले नाही. रोहित, विराट, चहल, बुमराह आणि पांड्या हे सहज संघात निवडले जातील. संघ सध्या फॉर्ममध्ये असला तरी यष्टिरक्षकाचा स्लॉट संघासाठी महत्त्वाचा आहे. धोनी उत्तम खेळाडू असण्यासोबतच त्याच्या सल्ल्याने अनेक खेळाडूंना फायदा होता.
पंत आणि इतर युवा यष्टिरक्षक यांच्यात चुरस असताना धोनी पुन्हा या समीकरणात उतरला आहे. त्याने आपला उत्साह कायम ठेवला, तरीही उच्चपातळीवर खेळ करण्यास उत्सुक आहे का?
(कन्सल्टिंग एडिटर लोकमत)

Web Title: Dhoni's name is discussed in the team equation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.