दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये २९ एप्रिलला झालेल्या सामन्यानंतर पोस्ट प्रजेंटेशन देण्यासाठी उभे असताना कुलदीप यादवने अचानक दोनवेळा रिंकू सिंहच्या कानशिलात लगावली आहे. ही घटना लाईव्ह सुरु असताना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. अरुण जेटली स्टेडिअममध्ये ही मॅच झाली, यामध्ये दिल्लीचा संघ या मैदानावर सलग दुसऱ्यांदा हरला आहे. पहिल्यांदा कानाखाली बसल्यानंतर रिंकू सिंहचा चेहरा उतरला होता.
दोन्ही संघांचे खेळाडू मॅच संपल्यानंतर मुलाखतीसाठी उपस्थित होते. मुलाखत सुरु होण्यापूर्वी रिंकू सिंह सह इतर खेळाडू, टीमचे पदाधिकारी हास्यविनोदात गुंतले होते. यावेळी बाजुला उभा असलेल्या कुलदीप यादवने अचानक रिंकूच्या कानशिलात ठेवून दिली. तसेच त्याला सुनावू लागला. पहिल्यांदा कानशिलात लावली तेव्हा वाटले की गंमतीने केले, परंतू रिंकूचा चेहरा लगेचच उतरला होता. त्यानंतर पुन्हा एकदा रिंकूच्या कानशिलात ठेवून देण्यात आली. तेव्हा रिंकूने रागाने कुलदीपला काहीतरी सांगितले. यानंतर कॅमेरा बाजुला करण्यात आला.
परंतू तोवर रिंकूच्या दोनदा कानशिलात लगावल्याचा प्रकार व्हायरल झाला होता. लोकांनी त्याचे स्क्रीनशॉट व्हिडीओ काढून सोशल मीडियावर कुलदीप यादववर राग व्यक्त केला आहे. कुलदीपला आयपीएलमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. या व्हिडीओला आवाज नव्हता, त्यामुळे प्रत्यक्षात काय घडले ते समजलेले नाही. कुलदीपने रिंकूच्या कानशिलात का दिली ते देखील समजू शकलेले नाही. हसता-हसता अचानक हा प्रकार घडला आहे.
२००८ च्या आयपीएलमध्ये श्रीशांत आणि हरभजन सिंग यांच्यात देखील असाच कानशिलात लगावण्याचा प्रकार घडला होता. हरभजन सिंगने श्रीशांतला थप्पड मारली होती, त्यानंतर हरभजन सिंगवर संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती. त्या हंगामात हरभजन सिंग मुंबई इंडियन्सकडून खेळत होता आणि श्रीशांत किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) कडून खेळत होता. शाहरुख खानने देखील सुरक्षा रक्षकासोबत वाईट व्यवहार केला होता. यामुळे त्यालाही एका सीझनसाठी बॅन करण्यात आले होते.