चेन्नई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे यंदाचे पर्व १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी उत्सुक माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आल्यानंतर धोनीने आपला लुक बदलला आणि फ्रेंचकट दाढी ठेवली आहे. आयपीएलचे वेळापत्रत पुढे ढकलण्यात आल्यानंतर धोनी चेन्नई शहर सोडले.
यादरम्यान तो चेन्नईसुपर किंग्सचे कार्यक्रम वगळता चाहत्यांना भेटत आहे. सीएसकेने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला त्यात माजी भारतीय कर्णधार धोनी सर्वांची भेट घेत असल्याचे दिसत असून, तो त्यांना स्वाक्षरीही देत आहे.
दरम्यान, एका चाहत्याने धोनीला म्हटले की, ‘चेन्नई तुमचे घर आहे का सर.’ चाहत्याच्या या वक्तव्यावर धोनीने स्मितहास्य करत हात हलवत होकार दिला. धोनीचा हा व्हिडिओ आतापर्यंत ५७ हजारापेक्षा अधिक वेळा पाहिला गेला. बीसीसीआयची शनिवारी आयपीएलच्या फ्रेंचायझी मालकांसोबत बैठक झाली. त्यात या महिन्याच्या अखेरपर्यंत ‘बघा व प्रतीक्षा करा’ या नीतीचा अवलंब करण्याचा निर्णय झाला. (वृत्तसंस्था)