CoronaVirus: Little chance of IPL! | CoronaVirus : आयपीएलची शक्यता कमीच!

CoronaVirus : आयपीएलची शक्यता कमीच!

- अयाझ मेमन (कन्सल्टिंग एडिटर लोकमत)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर क्रीडा जगतामध्ये मोठी खळबळ माजली आहे. जवळपास सर्वच स्पर्धा स्थगित करुन त्यांचे आयोजन पुढे ढकलण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी होणारी आॅलिम्पिकही पुढच्या वर्षी होईल. जपान सरकार खास करून पंतप्रधान शिंजो आबे ही स्पर्धा पुढे ढकलण्याच्या विरोधात होते. कारण या स्पर्धेच्या तयारीसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती.
आयओसीचे प्रमुख थॉमस बाक हेही निर्धारीत वेळेनुसारच आॅलिम्पिक आयोजित करण्यास इच्छुक होते. पण कोरोना विषाणूचे सावट पूर्ण जगावर पसरले आणि या अत्यंत गंभीर परिस्थितीमुळे अखेर आॅलिम्पिक पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावाच लागला. त्यातच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) आॅस्टेÑलियामध्ये आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या आगामी टी २० विशचषक स्पर्धेची पात्रता स्पर्धाही लांबणीवर टाकल्या आहेत. ही स्पर्धा जून अखेरपर्यंत रंगणार होती. त्यामुळे क्रीडा विश्वात सध्या अडचणी वाढत आहेत.
सध्या सर्वात मोठा प्रश्न निर्माण होत आहेत तो आयपीएलबाबत, आयपीएल होणार की नाही? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. शिवाय भारत सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्याने याविषयी चर्चा किंवा बैठक होण्याची शक्यताही दिसून येत नाही. त्यामुळेच बीसीसीआयने फ्रेंचाइजी मालकांसोबतची चर्चाही तूर्तास थाबवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
१५ एप्रिलपर्यंत कोणतीही चर्चा होणार नसल्याने त्यानंतर किती दिवसांत निर्णय होईल आणि स्पर्धा कशी आयोजित होईल, हाही मोठा प्रश्न आहे. कारण स्पर्धेच्या तयारीसाठी किमान एक महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळेच यंदाची आयपीएल होण्याची शक्यता खूप कमी दिसतेय. बीसीसीआयपुढे अनेक आव्हानेही आहेत.
जूननंतर छोट्या स्वरूपातील आयपीएल खेळविण्याचाही विचार होत आहे. यंदाचे सत्र कसे खेळविण्यात येईल, दोन सत्रांमध्ये यंदाच्या आयपीएलचे विभाजण होईल का, अशा अनेक दृष्टीने बीसीसीआयचे विचारमंथन सुरू आहे. पण एक मात्र नक्की की, जोपर्यंत कोरोनाचे संकट कमी होत नाही किंवा नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत या सर्व चर्चा निरर्थक ठरणार.

लॉकडाऊनदरम्यान करायचे काय?
लॉकडाऊन दरम्यान करायचे काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यावर मी काही सुचवू इच्छितो. या दरम्यान तुम्ही टीव्हीवर जुन्या सामन्यांचा आनंद घेऊ शकता. याशिवाय शारीरिक तंदुरुस्ती राखणेही महत्त्वाचे आहे. मी देखील बास्केटबॉलसोबत लहान खेळ खेळत वेळ घालवत आहे. यामुळे शरीरालाही व्यायम होतो. असे खेळ शक्यतो एकट्यानेच खेळा कारण सध्याच्या दिवसांमध्ये समूहाने खेळणे काहीसे धोकादायक ठरु शकते. याशिवाय काही व्यायामाचे प्रकार करून शारीरिक तंदुरुस्ती राखू शकता. यादिवसांत तंदुरुस्तीवर भर देताना मानसिकरीत्याही सकारात्मक रहा.

Web Title: CoronaVirus: Little chance of IPL!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.