Coronavirus: IPL cancellation status; Pressure increased after the 'lockdown' and the Olympic suspension | Coronavirus : आयपीएल रद्द होण्याच्या स्थितीत; ‘लॉकडाऊन’ आणि आॅलिम्पिक स्थगितीनंतर दबाव वाढला

Coronavirus : आयपीएल रद्द होण्याच्या स्थितीत; ‘लॉकडाऊन’ आणि आॅलिम्पिक स्थगितीनंतर दबाव वाढला

नवी दिल्ली : कोरोनापासून बचावासाठी भारतात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची मंगळवारी घोषणा झाली. यानंतर काही तासातच टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन वर्षभरासाठी स्थगित करण्यात आल्याचे आयओसीने जाहीर केले. या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगचे १३ वे सत्र रद्द करण्याचा बीसीसीआयवर सारखा दबाव येत आहे.
बीसीसीआयने या महिन्याच्या सुरुवातीला २९ मार्चपासून सुरू होणारे आयपीएलचे आयोजन १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. स्पर्धेचे आयोजन परिस्थिती सुधारल्यानंतरच होऊ शकेल, अशी त्यावेळी घोषणा केली होती.
तथापि परिस्थिती सुधारण्याऐवजी चिघळली. देशभरात ५०० वर कोरोनाबाधित झाले आहेत. ही गंभीरस्थिती पाहता आयपीएलच्या आयोजनाबाबत माझ्याकडेही कुठला उपाय नसल्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले होते.
किंग्स इलेव्हन पंजाबचे मालक नेस वाडिया यांनी या मुद्दावर स्पष्ट मत मांडले. ते म्हणाले,‘ बीसीसीआयने आता आयपीएलचा विचार सोडून द्यायला हवा. मुख्य क्रीडा आयोजक या नात्याने आम्ही जबाबदारीचे भान राखायला हवे. मे पर्यंत परिस्थिती सुधारली तरी आयोजनासाठी आमच्याकडे पुरेसा वेळ असेल, असे वाटत नाही. विदेशी खेळाडूंना देशात प्रवेश करण्याची परवानगी मिळेल का, याविषयी मला तरी शंका आहे.’
याआधी कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे बीसीसीआयने मंगळवारी आयोजित संघ मालकांसोबतची बैठक स्थगित केली. या संदर्भात बीसीसीआयच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,आॅलिम्पिक वर्षभरासाठी स्थगित होत असेल तर आयपीएल त्या तुलनेत फारच लहान आयोजन आहे. यंदा आयपीएलचे आयोजन दिवसेंदिवस कठीण होत आहे. विदेशी खेळाडूंना व्हिसा देण्याचा सरकार विचार करेल का, याचाही सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे परिस्थिती सामान्य कधी होईल, हे सांगणे कुणाच्याही हातात नाही. (वृत्तसंस्था)

आयपीएलच्या आयोजनाबाबत सध्यातरी मत व्यक्त करता येणार नाही. ज्या स्थितीत हे आयोजन पुढे ढकलले होते, त्याच स्थितीत आहोत. गेल्या दहा दिवसात काहीही बदलले नाही. सद्यस्थिती कायम असल्याने माझ्याकडे काहीच उत्तर नाही.
- सौरव गांगुली, अध्यक्ष, बीसीसीआय

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: IPL cancellation status; Pressure increased after the 'lockdown' and the Olympic suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.