coronavirus: उत्सुकता इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेची

इंग्लंडने गेल्या काही मालिकांमध्ये विंडीजवर वर्चस्व राखल्याचे दिसून आले आहे. पण सध्याच्या विंडीज संघात चांगले वेगवान गोलंदाज असून या जोरावर ते यजमानांना दबावाखाली आणू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 04:18 AM2020-07-05T04:18:31+5:302020-07-05T06:53:51+5:30

whatsapp join usJoin us
coronavirus: Curiosity of England-West Indies series | coronavirus: उत्सुकता इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेची

coronavirus: उत्सुकता इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेची

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन 

व्यावसायिक स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना प्रेक्षकांची उपस्थिती किती महत्त्वाची आहे याची जाणीव आहे. इंग्लंडमधून मिळालेल्या माहितीनुसार स्टुअर्ट ब्रॉडने यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून सल्लाही घेतला आहे. विराट कोहलीनेही प्रेक्षकांविना खेळण्याचा अनुभव खूप विचित्र ठरेल, असे म्हटले. बहुतेक खेळाडू कोहलीच्या मताशी सहमत असतील, असे मलाही वाटते. एकूणच सध्या अशा अनेक वादविवादांमुळे ही मालिका चर्चेत आली असताना या मालिकेत आता अटीतटीचा खेळ होण्याचीही अपेक्षा आहे.  इंग्लंडने गेल्या काही मालिकांमध्ये विंडीजवर वर्चस्व राखल्याचे दिसून आले आहे. पण सध्याच्या विंडीज संघात चांगले वेगवान गोलंदाज असून या जोरावर ते यजमानांना दबावाखाली आणू शकतात. याशिवाय केवळ विंडीज खेळाडूच नाही, तर इंग्लंडचे खेळाडूही सामन्यादरम्यान वर्णभेदाचा निषेधही करणार असल्याने त्याकडेही सर्वांचे लक्ष वेधले जाईल.

बु धवारपासून साऊथम्पटन येथे इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज या कसोटी मालिकेला सुरुवात होईल आणि तब्बल चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहण्यास मिळेल. मोठ्या कालावधीनंतर मैदानावरील खेळ पाहण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद आहे. पण त्याच वेळी कोरोनामुळे जगभरात झालेली उलथापालथ बघता, थोडी भीतीही आहेच. त्यामुळेच या मालिकेदरम्यान आरोग्याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. वेस्ट इंडिज संघही क्वारंटाईन होण्याच्या तयारीने खूप आधीच इंग्लंडमध्ये दाखल झाला आणि वेळोवेळी खेळाडूंच्या सातत्याने चाचण्याही पार पडल्या. एकूणच कोरोनाबाबत अत्यंत सतर्कता बाळगण्यात आली आहे.

असे असले तरी कोरोना विषाणू अत्यंत सूक्ष्म असल्यानेच थोडी भीतीही खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. गेल्याच आठवड्यात इंग्लंडचा अष्टपैलू सॅम कुरन याला सर्दी आणि खोकला झाल्याने त्याचे अलगीकरण करण्यात आले. त्याला त्याच्या हॉटेल रूममध्येच राहण्यास सांगण्यात आले आणि त्यानंतर करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत त्याचा अहवाल सुदैवाने निगेटिव्ह आला. असाच काहीसा प्रकार नुकताच इंग्लंड दौºयासाठी निघालेल्या पाकिस्तान संघासोबत झाला. त्यांच्या संघातील काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. शिवाय, अनुभवी खेळाडू मोहम्मद हाफिझ हाही पॉझिटिव्ह आढळला. यानंतर त्याने एका खासगी केंद्रात स्वत:हून चाचणी केली, तेव्हा तो निगेटिव्ह आढळला. त्यानंतर आणखी एकदा हाफिझची चाचणी झाली त्यात तो पुन्हा पॉझिटिव्ह आढळला. या अनुभवी खेळाडूचा चौथ्यांदा झालेल्या चाचणीचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आणि त्यानंतरच त्याला इंग्लंडला जाण्याची परवानगी मिळाली.

पण आता सध्या क्रिकेटविश्वात चर्चा आहे ती इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेची. सध्या जगात कोरोनाने थैमान घातले असताना याला रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची काळजी या मालिकेदरम्यान घेण्यात आली आहे. त्याच वेळी आता नव्या नियमानुसार चेंडूला लाळ लावता येणार नाही, त्यामुळे खेळाडू विशेषकरून गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागून राहील.

त्याचप्रमाणे अत्यंत सुरक्षित वातावरणात सामने खेळविण्यात येणार असल्याने स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश नसेल. याचा खेळाडूंवर कसा परिणाम होईल, हेही पाहावे लागेल. सध्या तरी बाहेरून बघताना ही सहज सोपी गोष्ट दिसत आहे. पण जर सर्वांचे लक्ष खेळाकडे आहे, तर प्रेक्षक नसल्याने काय फरक पडणार आहे, अशी चर्चा सध्या रंगत आहे.

Web Title: coronavirus: Curiosity of England-West Indies series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.