Corona Virus : MS Dhoni donates to support families of daily wage workers in Pune svg | लाखमोलाची मदत; पुण्यातील रोजंदारी कामगारांना MS Dhoniचं आर्थिक सहाय्य

लाखमोलाची मदत; पुण्यातील रोजंदारी कामगारांना MS Dhoniचं आर्थिक सहाय्य

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं पुण्यातील रोजंदारी कामगारांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशभरातील रोजंदारी कामगारांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. अशा रोजंदारी कामगारांसाठी धोनीनं आर्थिक मदत केली आहे. रोजंदारी कामगारांना आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी मुकूल माधव फाऊंडेशन ही संस्था निधी गोळा करत आहे, त्यांच्या या उपक्रमाला धोनीनं 1 लाखांची मदत केली आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि पुण्यातील संख्याही अधिक आहे. त्यामुळे अन्य शहरांप्रमाणे हेही शहर पूर्णपणे लॉकडाऊन केले गेले आहे. धोनीनं केलेल्या मदतीतून रोजंदारी कामगारांना जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत.  मुकूल माधव फाऊंडेशननं पुणे शहरातील अशा काही रोजंदारी कामगारांना शोधलं आहे आणि त्यांना ही मदत केली जाणार आहे. साबण, कडधान्य, तांदुळ, पीठ, तेल, पोहा, बिस्किट इत्यादी वस्तू या कुटुंबीयांना देण्यात येतील.  

धोनीची पत्नी साक्षीनं इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ही माहीती शेअर केली आहे आणि तिनं इतरांनाही देणगी देण्याचं आवाहन केलं आहे. आतापर्यंत या फाऊंडेशनला सर्वाधिक देणगी देण्याचा मान धोनीनं मिळवला आहे. या उपक्रमातून 12 लाख 50 हजार निधी जमा करण्याचा फाऊंडेशनचा मानस आहे. धोनीच्या मदतीनंतर फाऊंडेशनच्या निधीचा आकडा 12 लाखांच्या वर गेला आहे. 


 
धोनीच्या आधी टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली, इरफान व युसूफ पठाण यांनीही कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सरकारला मदत केली आहे. गांगुलीनं गरजूंना 50 लाख किमतीचे तांदुळ दिले आहेत, तर पठाण बंधुंनी मास्क वाटप केले आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन यानेही पंतप्रधान मदत निधीत आपले योगदान केले आहे. 
  

Web Title: Corona Virus : MS Dhoni donates to support families of daily wage workers in Pune svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.