...म्हणून मी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे चेंडू अंगावर घेतले; पुजारानं सांगितलेलं कारण वाचून डोळे पाणावतील

चेतेश्वर पुजाराच्या संयमी खेळीचा भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा

By कुणाल गवाणकर | Published: January 22, 2021 04:54 PM2021-01-22T16:54:47+5:302021-01-22T16:59:08+5:30

whatsapp join usJoin us
Cheteshwar Pujara Reveals Why he Decided to Let the Ball Hit His Body in Brisbane | ...म्हणून मी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे चेंडू अंगावर घेतले; पुजारानं सांगितलेलं कारण वाचून डोळे पाणावतील

...म्हणून मी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे चेंडू अंगावर घेतले; पुजारानं सांगितलेलं कारण वाचून डोळे पाणावतील

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई: भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पहिल्याच कसोटी सामन्यात अवघ्या ३६ धावांत भारतीय संघ गारद झाला. मात्र त्यानंतर भारतानं राखेतून भरारी घेत पिछाडीवरून मालिका जिंकली. या मालिका विजयात फलंदाज चेतेश्वर पुजारानं मोलाचं योगदान दिलं. एका बाजूनं टिच्चून खेळणाऱ्या पुजारासमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाज हतबल झाले. पुजारानं एका बाजूनं नांगर टाकल्यानं भारताच्या इतर फलंदाजांना दुसऱ्या बाजूनं फटकेबाजी करता आली.



चौथ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी चेतेश्वर पुजाराला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी जबरदस्त मारा केला. वेगवान गोलंदाजांचे चेंडू अनेकदा पुजाराला लागले. मात्र तरीही पुजारा खिंड लढवत आत्मविश्वासानं उभा राहिला. पुजाराच्या अंगावर १४० किलोमीटर प्रति तासपेक्षा अधिक वेगानं येणारे चेंडू येऊन आदळत होते. त्यामुळे त्याला प्रचंड वेदना होत होत्या. इतक्या वेदना होत असताना पुजारा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा मारा थेट अंगावर का घेत होता, असा प्रश्न अनेकांना पडला. त्याचं उत्तर खुद्द पुजारानं दिलं आहे.



'मुख्यत: पॅट कमिन्सचे चेंडू माझ्या अंगावर येत होते. खेळपट्टीला काही ठिकाणी तडे गेले होते. तिथून पडणारे चेंडू थेट उसळत होते. अशा ठिकाणी पडलेले चेंडू अनेकदा सोडून देता येतात. पण अशा प्रकारचे चेंडू टाकताना कमिन्स त्याच्याकडे असणारं कौशल्य उत्तमपणे वापरतो. त्यामुळे तुम्हाला चेंडू खेळावाच लागतो. कारण चेंडू तुमचा पाठलाग करतो. यावेळी मी बचाव करण्यासाठी हाताचा वापर केला असता, तर चेंडू ग्लव्जना लागण्याची शक्यता होती. त्यामुळे झेल गेला असता. त्यावेळी सामना निर्णायक स्थितीत होता आणि विकेट गमावणं संघाला परवडणारं नव्हतं. त्यामुळेच मी कमिन्सचे चेंडू अंगावर घेण्याचं ठरवलं,' असं पुजारानं सांगितलं.



मला पेन किलर्स घेण्याची सवय नसल्याचं पुजारा पुढे म्हणाला. 'पेन किलर्स घेण्याची सवय मला नाही. त्यामुळे मी बराच वेळ वेदना सहन करू शकतो. क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केल्यापासूनच मी पेन किलर्स घेण्याची सवय स्वत:ला लावली नाही. त्यामुळे वेदना सहन करण्याची क्षमता वाढली. तुम्हाला कित्येक तास फलंदाजी करायची असते. त्यावेळी वेदना सहन करण्याची क्षमता कामी येते,' असं पुजारानं म्हटलं.

चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी ३२८ धावांची गरज होती. सलामीवीर रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानं पुजारानं शुबमन गिलसोबत शतकी भागिदारी केली. पुजारानं एक बाजू भक्कमपणे लावून धरल्यानं गिलनं दुसऱ्या बाजूनं फटकेबाजी केली. गिल बाद झाल्यानंतरही पुजारा खेळपट्टीवर ठाण मांडून उभा होता. त्यानं २११ चेंडूंमध्ये ५६ धावांची खेळी केली. तब्बल ५ तासांहून जास्त वेळ तो खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. त्यामुळे इतर फलंदाजांना फटकेबाजी करणं सोपं गेलं.
 

Web Title: Cheteshwar Pujara Reveals Why he Decided to Let the Ball Hit His Body in Brisbane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.