'bowler Become a Batsman' in international cricket | आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'गोलंदाज बनले फलंदाज'; पाहा असे क्रिकेटपटू आहेत तरी कोण...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'गोलंदाज बनले फलंदाज'; पाहा असे क्रिकेटपटू आहेत तरी कोण...

ललित झांबरे : गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तळाकडील खेळाडूंनी म्हणजे गोलंदाजांनी फलंदाजीत धम्माल केली आहे. वास्तविक फलंदाजीत त्यांच्याकडून फारशी अपेक्षाच नसते पण या अपेक्षेच्या पलीकडे त्यांनी कामगिरी केली म्हणूनच ते लक्षवेधी ठरले आहेत. यात दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज, त्यांचाच मध्यमगती गोलंदाज डेन पॅटरसन व अॅनरिच नोर्तजे, वेस्ट इंडिजचा शेल्डन कॉट्रेल यांचा उल्लेख करता येईल. 

Image result for sheldon cottrell batting

यात ठळक कामगिरी म्हणजे केशव महाराजची. इंग्लंडविरुध्दच्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात याने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना जवळ जवळ अडीच तास खिंड लढवली आणि 71 धावा करताना दक्षिण आफ्रिकेचा पराभव लांबवला.  इंग्लंडच्या गोलंदाजांच्या संयमाची परीक्षा घेणाऱ्या या खेळीत त्याने जो रुटच्या एकाच षटकात स्वतःच्या 24 धावांसह एकूण 28 धावा वसुलण्याचा तडाखाही दाखवला. यासह त्याने ब्रायन लारा व जॉर्ज बेली यांच्या विश्वविक्रमाचीही बरोबरी केली. 

केशव महाराज- पॕटरसनची भागीदारी

Image result for dane paterson cricketer

महाराजच्या या खेळीची आणखी एक विशेष बाब म्हणजे त्याने शेवटचा गडी डेन पॕटरसन या पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या जलद गोलंदाजाला साथीला घेत तब्बल तासभर इंग्लंडच्या गोलंदाजांना दाद दिली नाही. या दोघांनी शेवटच्या गड्यासाठी तब्बल 99 धावांची भागिदारी केली. 

पोर्ट एलिझाबेथ येथेच कसोटी पदार्पण करतानाच शेवटच्या गड्यासाठी तिसऱ्या क्रमांकाची मोठी भागिदारीच्या विक्रमाचा डेन पॕटरसन भागीदार ठरला आणि त्याच्या नाबाद 39 धावा ही कसोटी पदार्पणातच 11 व्या क्रमांकावरील फलंदाजाने केलेली चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी ठरली. 

कसोटी पदार्पण करणाऱ्या 11 व्या क्रमांकावरील फलंदाजाची ही तिसऱ्या क्रमांकाची मोठी भागीदारी ठरली. 

शेवटच्या गड्यासाठीच्या या पदार्पणातील विक्रमी भागिदाऱ्या  अशा...

120 धावा- आर.ए.डफ* (104)/बिल आर्मस्ट्राँग (45)- आॕस्ट्रेलिया वि. इंग्लंड, मेलबोर्न, 1902
------------------------------------------------------
163 धावा- अॕश्टन एगर*  (98)/पी. जे. ह्युजेस (81)- आॕस्ट्रेलिया वि. इंग्लंड, नाॕटिंगहॕम, 2013
--------------------------------------------------------
99 धावा- केशव महाराज (71)/ डेन पॕटरसन*  (39)- दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंड+, पोर्ट एलिझाबेथ, 2020

* पदार्पणवीर 11 व्या क्रमांकाचा फलंदाज
* आर.ए. डफ यांचाही हा पदार्पणाचा सामना होता आणि त्यांनी 10 व्या क्रमांकावर ही शतकी खेळी केली. 
+ योगायोगाने या तिनही भागिदाऱ्या इंग्लंडविरुध्द आहेत. 


कसोटी पदार्पणात 11 व्या क्रमांकावरील फलंदाजाच्या सर्वोच्च कसोटी खेळी

98- अॕश्टन एगर (आॕस्ट्रेलिया) वि. इंग्लंड- 2013
45- वाॕर्विक आर्मस्ट्राँग (आॕस्ट्रेलिया) वि. इंग्लंड- 1902
40- चमिला लक्षिता (श्रीलंका) वि. बांगलादेश- 2002
39- डेन पॕटरसन (दक्षिण आफ्रिका) वि. इंग्लंड- 2020

चोख नाईट वॉचमन ठरला नोर्तजे

तळाकडील खेळाडूंच्या नियमीत फलंदाजांना फिक्या पाडणाऱ्या या कामगिरी एवाढ्यावरच थांबत नाहीत तर अॕनरिच नोर्तजे हा दक्षिण आफ्रिकन गोलंदाजही फलंदाज म्हणून लक्षवेधी ठरलाय. तो सहसा आठव्या क्रमांकाच्या खालीच फलंदाजीला येतो पण इंग्लंडविरुध्दच्या या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने दोन वेळा त्याला नाईट वॉचमन म्हणून वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले आणि दोन्ही वेळा त्याने दीर्घकाळ खेळी करुन आपली जबाबदारी चोख पार पाडली. पहिल्या कसोटीत सेंचुरियन येथे सहाव्या क्रमांकावर खेळताना त्याने धावा 40 च केल्या पण त्यासाठी 127 मिनिटे खेळून काढली. तिसऱ्या कसोटीत पोर्ट एलिझाबेथ इथे तर नाईट वॉचमन म्हणून त्याला चौथ्या  क्रमांकावर धाडण्यात आले आणि यावेळी त्याने धावा 18 च केल्या पण खेळपट्टीवर तो 191 मिनिटे टिकून होता. 

नाईट वॉचमन म्हणून दोन तासांपेक्षा अधिक काळ मालिकेत दोन वेळा फलंदाजी करणारा तो दुसराच! असा पहिला फलंदाज होता आपला लढाऊ यष्टीरक्षक सईद किरमाणी. त्याने 1979-80 च्या आॕस्ट्रेलिया विरुध्दच्या मालिकेत चेन्नई व मुंबई कसोटीत अशी पाय रोवून फलंदाजी केली होती. 

शेल्डन काॕट्रेलचा विजयी षटकार

त्याआधी 10 जानेवारी शेल्डन कॉट्रेल हा 11 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना हिरो ठरला. आयर्लंडविरुध्दच्या दुसऱ्या वन डे सामन्यात ब्रिजटाऊन येथे सामन्यातील एकच चेंडू  बाकी असताना त्याने षटकार लगावुन विंडीजला विजय मिळवून दिला होता.

वन डे इंटरनॅशनल सामन्यांमध्ये एखाद्या संघाला 11 व्या क्रमांकाच्या फलंदाजाने षटकार लगावून सामना जिंकून देण्याची ही पहिलीच वेळ होती. 

अशाप्रकारे षटकार नव्हे पण सामन्यातील शेवटच्या चेंडूला चौकार लगावून डिसेंबर, 2006 मध्ये मायकेल मॕसन याने न्यूझीलंडला श्रीलंकेवर विजय मिळवून दिला होता. त्या सामन्यात न्यूझीलंडला शेवटच्या षटकात फक्त एका धावेची गरज होती पण जयसुर्याने पहिल्या पाच चेंडूवर एकही धाव घेऊ दिली नव्हती. त्यानंतर शेवटचा चेंडू मात्र 11व्या क्रमांकावरील फलंदाज मॕसन याने    चौकारासाठी तडकावला होता.  त्याची आठवण शेल्डन काॕट्रेलच्या षटकारांने करुन दिली. 

Web Title: 'bowler Become a Batsman' in international cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.