लंडन : भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्यास काही दिवस शिल्लक असताना इंग्लंड क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने काही काळासाठी क्रिकेटपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टोक्सने काही काळापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून स्वत:ला वेगळे केले आहे.
शुक्रवारी इंग्लंड क्रिकेट संघाला ही धक्कादायक माहिती मिळाली. स्टोक्सने वैयक्तिक कारणामुळे भारताविरुद्धच्या मालिकेतून माघार घेतली. सध्या आपण क्रिकेटच्या कोणत्याही सामन्यासाठी उपलब्ध राहू शकणार नसल्याचेही त्याने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डला (ईसीबी) कळवले. कोरोना महामारीदरम्यान सर्वच क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना बायो बबलमध्ये ठेवत आहेत. मात्र याचा खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होताना दिसत आहे. यामुळेच स्टोक्सने काहीवेळ ब्रेक घेतल्याचे म्हटले जात आहे. आयसीसीनेही स्टोक्सने ब्रेक घेतल्याच्या निर्णयाची माहिती दिली. ईसीबीने स्टोक्सचा हा निर्णय धाडसी असल्याचे म्हटले.