The BCCI ignored the situation in the country of corona | देशातील परिस्थितीकडे बीसीसीआयचे झाले दुर्लक्ष

देशातील परिस्थितीकडे बीसीसीआयचे झाले दुर्लक्ष

अयाज मेनन

आयपीएलचे यंदाचे सत्र अखेर समाप्त झाले. ३० मेपर्यंत रंगणारे हे सत्र कोरोनामुळे लवकर गुंडाळावे लागले. खेळाडूंच्याही सातत्याने चाचण्या होत आहेत. याआधी कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघातून वरुण चक्रवर्थी आणि संदीप वॉरियर हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तसेच चेन्नई सुपरकिंग्स संघाच्या सपोर्ट स्टाफमधील तीन जण पॉझिटिव्ह आढळले. यामुळे सोमवारी केकेआर विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) सामनाही रद्द झाला होता. मंगळवारी होणारा मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामनाही रद्द झाला. कारण, हैदराबाद संघातील रिद्धिमान साहा पॉझिटिव्ह आढळला. तसेच दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्राही पॉझिटिव्ह आढळला. यानंतर बीसीसीआयने सामने पुढे ढकलून हे सामने नव्याने खेळविण्याचा प्रयत्न केला. कारण, स्पर्धा सुरू झाल्यानंतर ती पूर्ण करण्याची जबाबदारी बीसीसीआयवर होती.

पण, सद्य:परिस्थितीत हे कठीण होते. अर्धे संघ दिल्ली आणि अर्धे संघ अहमदाबाद येथे असून दोन्ही बाजूंनी कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळेच स्पर्धा सुरू ठेवण्यात अर्थ नव्हता. शिवाय कोरोनाची स्थिती पाहता आधीच आयपीएलवर विरोध होत होता. मात्र, आयपीएलमुळे मानसिक ताणही कमी होत होता. लोकांचे मनोरंजन होत होते, अनेकांचे रोजगारही सुरू होते. पण तरी सर्वात मोठे संकट हे व्हायरसचे होते. दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तान सुपर लीगही अशाच प्रकारे स्थगित करण्यात आली होती. भारताच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास हा धोका सुरुवातीपासून होता.  स्पर्धा आयोजन करताना बीसीसीआयचे संपूर्ण लक्ष देशातील कोरोना स्थितीकडे असायला हवे होते. एक क्रीडा संघटना म्हणून ही त्यांची जबाबदारी होती. उदाहरण द्यायचे झाल्यास जपानने कितीही सांगितले, की आम्ही ऑलिम्पिक आयोजनास सज्ज आहोत, तरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची ही जबाबदारी आहे की तिथे सर्व गोष्टींची चाचपणी करावी. त्यामुळे बीसीसीआयनेही अशीच काळजी घ्यायला पाहिजे होती.

बीसीसीआयच्या काही सदस्यांनी मार्चमध्येच भारतातील कोरोना परिस्थितीची जाणीव करून दिली होती. मात्र, त्याकडे अनेकांनी व बीसीसीआयने दुर्लक्ष केले होते. पुन्हा एकदा यूएईचा पर्यायही देण्यात आला होता.

प्रश्न उरला खेळाडूंचा!
n आता अडचण अशी आहे की, खेळाडू, अधिकारी आणि कर्मचारी आपल्या घरी कसे पोहचणार? भारतीय खेळाडूही देशातील विविध भागांतून येतात. सर्वात मोठा प्रश्न विदेशी खेळाडूंचा आहे. 
n ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड या देशांनी भारतातील हवाई प्रवास बंद केला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लागेल. क्रिकेट कधीही खेळता येईल; पण त्यासाठी जिवाशी खेळायला नको. त्यामुळेच बीसीसीआयने घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The BCCI ignored the situation in the country of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.