Babar Azam : बाबर आजम, एकेकाळी बॉल बॉय बनण्यासाठी 3Km पायपीट करायचा अन् आज जगावर करतोय राज्य!

Babar Azam - Pakistan's Prized Cricketer Who Walked 3 Miles To Work As A Ball Boy पाकिस्तानी क्रिकेट संघासाठी १४ एप्रिल हा दिवस ऐतिहासिक ठरला. कर्णधार बाबर आजमनं ( Babar Azam) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जाहीर केलेल्या वन डे फलंदाजंच्या क्रमवारीत ( ICC ODI Rankings) अव्वल स्थान पटकावले.

By स्वदेश घाणेकर | Published: April 15, 2021 08:30 AM2021-04-15T08:30:00+5:302021-04-15T08:30:03+5:30

whatsapp join usJoin us
From ball boy in 2007 to becoming the No.1 ODI batsman, Pakistan's Prized Cricketer  Babar Azam has come a long way | Babar Azam : बाबर आजम, एकेकाळी बॉल बॉय बनण्यासाठी 3Km पायपीट करायचा अन् आज जगावर करतोय राज्य!

Babar Azam : बाबर आजम, एकेकाळी बॉल बॉय बनण्यासाठी 3Km पायपीट करायचा अन् आज जगावर करतोय राज्य!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानी क्रिकेट संघासाठी १४ एप्रिल हा दिवस ऐतिहासिक ठरला. कर्णधार बाबर आजमनं ( Babar Azam) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं जाहीर केलेल्या वन डे फलंदाजंच्या क्रमवारीत ( ICC ODI Rankings) अव्वल स्थान पटकावले. त्याच्या अव्वल स्थानापेक्षा त्यानं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला त्या क्रमांकावरून पायऊतार केल्याचा आनंद पाकिस्तानमध्ये नक्की अधिक साजरा झाला असावा. हा चाहत्यांचा विषय आहे. त्यांच्या या रडीच्या डावामुळे बाबरनं घेतलेल्या गरुड भरारीचं महत्त्व कमी होणार नाही. मोहम्मद युसूफ याच्यानंतर वन डेत अव्वल स्थान पटकावणारा तो कदाचित पाकिस्तानचा पहिलाच फलंदाज ठरला असावा.

अव्वल स्थानाचा आनंद बाबरनेही दणक्यात साजरा केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यानं  ५९ चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारांसह १२२ धावा चोपल्या. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. ट्वेंटी-२०त धावांचा पाठलाग करताना शतक झळकावणारा तो पहिलाच कर्णधार ठरला. बाबर आणि विराट यांची तुलना होत आलीय आणि ती यापुढेही कायम राहिल.

इतर क्रिकेटपटूंप्रमाणे बाबरचा इथपर्यंतचा प्रवास खडतरच होता. लाहोरमध्ये जन्मलेल्या या खेळाडूनं पहिली बॅट हातात धरली ती रस्त्यावर क्रिकेट खेळण्यासाठी. साधारण प्रत्येक क्रिकेटपटू हा गल्ली क्रिकेट खेळल्यानंतरच मोठ्या मैदानावर स्वतःचे कौशल्य दाखवण्यासाठी उतरला असेल. १२व्या वर्षी त्यानं क्रिकेटला मनावर घेतलं आणि १४व्या वर्षी त्याला नॅशनल अकादमीनं प्रवेश देण्यास नकार दिला. ते त्याच्या आयुष्यातील पहिले आणि कदाचित अखेरचे अपयश असावे.

त्या अपयशातून तो खचला नाही, तर आणखी जोमानं तयारीला लागला आणि पुढील वर्षी नॅशनल अकादमीत प्रवेश मिळवला. इतकंच नाही तर त्याला देशातील १५ वर्षांखालील सर्वोत्तम फलंदाज म्हणूनही गौरविले गेले. या वर्षभरात त्यानं प्रचंड मेहनत घेतली. सकाळी १० वाजता दोन चुलत भावंड व काही मित्रांसह तो तासभर चालत मॉडेल टाऊन पार्क येथील मैदानावर नेट्समध्ये सराव करायला जायचा. रात्री ८ वाजेपर्यंत त्याचा हा सराव चालायचा.


२००९मध्ये आयसीसीच्या १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत १५ वर्षांचा बाबर सलामीला उतरला आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्यानं १३२ चेंडूंत १२९ धावांची धमाकेदार खेळी केली. त्या स्पर्धेत पाकिस्तानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आणि बाबर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ( २९८ धावा, ५९.६० सरासरी) तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यानं जो रूट, बेन स्टोक्स व लोकेश राहुल यांना मागे टाकले. 

दोन वर्षानंतर त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ १९ वर्षांखालील वर्ल्ड कप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला. त्यानं पुन्हा ५७.३०च्य सरासरीनं २८७ धावा करताना तिसरे स्थान पटकावले. त्याच्या या खेळीत एक शतक व दोन अर्धशतकांचा समावेश होता. 

१७ वर्षांचा असताना त्याच्याकडे दोन वर्ल्ड कप ( १९ वर्षांखालील) खेळण्याचा अनुभव होता. वयाच्या १५व्या वर्षी त्यानं लिस्ट ए, तर १६ व्या वर्षी ZTBLसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी तो पाच वर्ष सातत्यानं स्थानिक क्रिकेटमध्ये धावा करत राहिला.  वन डे पदार्पणाची संधी मिळाली तेव्हा त्याच्या नावावर लिस्ट ए क्रिकेटमध्ये सहा शतकं व २०००+ धावांची नोंद झाली होती.

३१ मे २०१५ मध्ये घरच्या मैदानावर त्यानं वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. लहानपणी तो ज्या मॉडेल टाऊन पार्कवर सराव करायचा तिथून लाहोरचं गड्डापी स्टेडियम पाच किमी अंतरावर आहे. हे पाच किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी त्याला सहा वर्षांहून अधिक काळ लागला. २० वर्षीय बाबरनं झिम्बाब्वेविरुद्धच्या त्या सामन्यात ६० चेंडूंत ५४ धावा केल्या.    

आता तो जगातील सर्वोत्तम वन डे फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्या नावावर ८० वन डे सान्यांत ५६.८३च्या सरासरीनं ३८०८ धावा आहेत आणि त्यात १३ शतकांचा समावेश आहे. सुरूवातीच्या १५ वन डे सामन्यांत त्याच्या धावांची सरासरी ही ३७.५७ इतकी होती आणि नावावर फक्त पाच अर्धशतकं होती. सप्टेंबर २०१६मध्ये त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले शतक झळकावले अन् तिथून त्यानं मागे वळून पाहिलेच नाही.  

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्यानं सलग तीन शतकं झळकावली आणि वन डे तील पहिली तीन शतकं सलग डावांत करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू बनला. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत त्यानं पाकिस्तानला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्ताननं १९९२ला वर्ल्ड कप उंचावला तेव्हा बाबरचा जन्मही झाला नव्हता. चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर घरी त्याचे जल्लोषात स्वागत झाले.    

२००७ मध्ये पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यात सीमारेषेवर बॉल बॉय असलेला बाबर आज जागतिक वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.
 

Web Title: From ball boy in 2007 to becoming the No.1 ODI batsman, Pakistan's Prized Cricketer  Babar Azam has come a long way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.