भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरी कसोटी : वनडे मालिकेनंतर भारताला पहिल्या कसोटी सामन्यातही भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारताचा पराभव होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. या गोष्टीचे कारण दस्तुरखुद्द बीसीसीआयनेच सांगितले आहे.

यजमान न्यूझीलंड संघानं पहिल्या कसोटीत दहा विकेट्स राखून दणदणीत विजयाची नोंद करताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांचा किवी गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. टीम साऊदी, कायले जेमिसन आणि ट्रेंट बोल्ट या त्रिकुटानं तर टीम इंडियाची दाणादाण उडवली. त्यात दुसऱ्या कसोटीसाठी न्यूझीलंडच्या ताफ्यात प्रभावी मारा करणारा नील वॅगनर दाखल झाला आहे. पण, टीम इंडियाची चिंता वाढवणारा प्रसंग गुरुवारी घडला आहे. सराव सत्रात भारताच्या सलामीवीराचा डावा पाय सूजला आहे. त्यामुळे त्यानं सराव सत्रातूनही माघार घेतली आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला बसलेला हा मोठा धक्का आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची चिंता वाढली आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना अपयश आले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पृथ्वी शॉला कसोटीत सलामीला येण्याची संधी मिळाली, परंतु त्याला साजेसा खेळ करता आला नाही. मयांक अग्रवालनं दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली, परंतु तोही साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. विराटनं दोन्ही डावांत 2 व 19 अशा धावा केल्या. रिषभ पंत, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा फॉर्मही टीम इंडियासाठी चिंतेंची बाब बनला आहे. फलंदाजांच्या अपयशामुळे गोलंदाजांवरील दडपण वाढत आहे. अशात सलामीवीराची दुखापत म्हणून टीम इंडियाची डोकेदुखी वाढण्याचंच काम आहे.

आता भारतीय संघाची डोकेदुखी अजून वाढलेली आहे. कारण बीसीसीआयने दुसरा कसोटी सामना जिथे होणार आहे त्या ठिकाणचा फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये खेळपट्टी नेमकी कुठे आहे, असा प्रश्नही बीसीसीआयने विचारला आहे. या मैदानातील खेळपट्टीवर जास्त गवत ठेवण्यात आले आहे. खेळपट्टीवर जास्त गवत ठेवण्यात आल्यावर चेंडू जास्त वेगवान येतो आणि चांगला स्विंगही होतो. या गोष्टीची न्यूझीलंडच्या संघाला सवय आहे. पण भारतीय खेळाडूंची हिरव्या खेळपट्टीवर खेळताना भंबेरी उडते. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीच न्यूझीलंडने भारताला धक्का दिला आहे, असे म्हटले जात आहे.

 

Web Title: bad news for Indian cricket team ; New Zealand made green top pitch for second test prl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.