दुबई : आशिया चषकातील सामन्यात पाकिस्तानने दुबळ्या हाँगकाँगला ८ गड्यांनी पराभूत करीत स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. तीन बळी घेणारा उस्मान खान आणि अर्धशतक झळकावणारा इमाम उल हक हे पाकिस्तानच्या विजयाचे शिल्पकार ठरले. हाँगकाँगने दिलेले ११७ धावांचे आव्हान २ गड्यांच्या मोबदल्यात पाकिस्तानच्या संघाने २३.४ षटकांत १२० धावा करीत सहज पूर्ण केले.
पाकिस्तानच्या इमाम उल हक या युवा फलंदाजाने ६९ चेंडूंत नाबाद ५० धावा केल्या. त्याने फखर जमाँच्या साथीने ४१ धावांची भागीदारी केली. हाँगकाँगच्या एहसान खान याने जमाँला बाद केले. त्यानंतर बाबर आझमही ३३ धावा करून बाद झाला. त्यावेळी पाकिस्तान २ बाद ९३ धावा अशा अवस्थेत होता. तोपर्यंत पाकिस्तानचा विजय ही फक्त औपचारिकता होती. शोएब मलिक नाबाद ९ याने इमामच्या साथीने विजय साकारला. हाँगकाँगकडून दोन्ही बळी एहसान खान याने घेतले.
तत्पूर्वी हाँगकाँगची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर निजाकत खान याला शादाब याने धावबाद केले. त्यावेळी संघाच्या फक्त १७ धावा झाल्या होत्या. त्यानंतर कर्णधार अंशुमन राठ आणि बाबर हयात यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र राठ बाद झाल्यावर कार्टर आणि हयात हे दोन्ही फलंदाज लागोपाठ तंबूत परतला. मधल्या फळीतील फलंदाज एहसान खान याला तर भोपळाही फोडता आला नाही.
किंचित शाह याने २६ धावांची खेळी केली, तर एजाज याने २७ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. तीन फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही, तर चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. किंचित आणि एजाज यांनी ५३ धावांची भागीदारी केली. त्यामुळे हाँगकाँगला किमान शतकी धावसंख्या तरी ओलांडता आली. पाकिस्तानच्या उस्मान खान याने १९ धावांत तीन गडी बाद केले. तर फहीम अश्रफ याने एक, हसन अली, शादाब खान यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
धावफलक
हाँगकाँग : निजाकत खान धावबाद शादाब खान १३, अंशुमन राठ झे. सर्फराज अहमद गो. फहीम अश्रफ १९, बाबर हयात झे. सर्फराज अहमद गो. शादाब खान ७, सी कार्टर झे. इमाम उल हक गो. हसन अली २, किंचित शहा झे. शादाब खान गो. हसन अली २६, एहसान खान पायचित शादाब खान ०, एजाज खान गो. उस्मान खान २७, मॅकेन्झी पायचित उस्मान खान ०, तन्वीर अफजल गो. उस्मान खान ०, एहसान नवाज धावबाद हसन अली / सर्फराज अहमद ९, नदीम अहमद नाबाद ९ अवांतर ४; सर्व बाद ११६. गोलंदाजी - उस्मान खान ७.३-१-१९-३, फहीम अश्रफ ४-०-१०-१, हसन अली ७.१-०-१९-२, शादाब खान ८-१-३१-२.
पाकिस्तान २३.४ षटकांत १२० धावा. फखर जमाँ झे. मॅकेन्झी गो. एहसान खान २४, इमाम उल हक नाबाद ५०, बाबर आझम झे. मॅकेन्झी गो. एहसान खान ३३, शोएब मलिक नाबाद ९; गोलंदाजी - तन्वीर अफजल ४-२-१३-०, एहसान नवाज ४-०-२७-०, एजाज खान ३.४-०-१९-०, एहसान खान ८-०-३४-२.