Asia Cup 2018: Bangladesh in the final of Asia Cup | Asia Cup 2018 : पाकिस्तानची शिकार करत बांगलादेश फायनलमध्ये   
Asia Cup 2018 : पाकिस्तानची शिकार करत बांगलादेश फायनलमध्ये   

दुबई  - अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानचा 37 धावांनी पराभव करत बांगलादेशनेआशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. आशिया चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची बांगलादेशची ही तिसरी वेळ आले. आता शुक्रवारी होणाऱ्या आशिया चषकाच्या अंतिम लढतीत भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने येणार आहेत. 
बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र इमाम उल हकने एक बाजू लावून धरत पाकिस्तानचे आव्हान जिवंत ठेवले. पण इमाम उल हक 83 धावा काढून बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा डाव गडगडला. अखेर त्यांना 37 धावांनी पराभव पत्करावा लागला. 
  आशिया कप सुपर फोर गटातून अंतिम फेरीत प्रवेशासाठी पाकिस्तानविरुद्ध बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ४८.५ षटकांत सर्र्वबाद २३९ धावा केल्या. त्यात मुशिफिकूर रहिम (९९) दुर्देवी ठरला. शतकाच्या उंबरठ्यावर असताना तो बाद झाला. पाकच्या जुनैद खानने ४ बळी घेतले.
 बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जुनैद खान व शहिन शाह आफ्रिदी यांच्या भेदकतपुढे बांगलादेशची आघाडीची फळी स्वस्तात तंबूत परतली. सलामीवीर लिट्टन दास, सौम्य सरकार व मोमीनुल हक हे फक्त १२ धावातच तंबूत परतले. त्यानंतर मुशिफिकूर रहिम व मोहम्मद मिथून यांनी १४४ धावांची भागिदारी करत संघाला सावरले. हसन अलीने मिथूनला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर बांगलादेशचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाल्याने त्यांचा डाव २३९ धावांत आटोपला. मोहम्मदुल्लाहने २५ धावांचे योगदान दिले. रहिमने ११६ चेंडूत ९ चौकारांसह ९९, तर मोहम्मद मिथूनने ८४ चेंडूत ४ चौकारांसह ६० धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून जुनैद खानशिवाय आफ्रिदी आणि हसन यांनी प्रत्येकी २ बळी घेत चांगला मारा केला. 

Web Title: Asia Cup 2018: Bangladesh in the final of Asia Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.