अजिंक्य रहाणे वन डे संघात परतणार, बीसीसीआय लवकरच घोषणा करणार?

भारतीय संघाला मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 03:15 PM2020-01-15T15:15:27+5:302020-01-15T15:15:53+5:30

whatsapp join usJoin us
Ajinkya Rahane might receive a recall for New Zealand ODIs, claims report | अजिंक्य रहाणे वन डे संघात परतणार, बीसीसीआय लवकरच घोषणा करणार?

अजिंक्य रहाणे वन डे संघात परतणार, बीसीसीआय लवकरच घोषणा करणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाला मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. शिखऱ धवन आणि लोकेश राहुल यांच्या 121 धावांच्या भागीदारीनंतरही टीम इंडियाला 255 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांच्या शतकांनी ऑसींनी एकही विकेट न गमावता हा सामना जिंकला. या सामन्यात टीम इंडिया तीन स्पेशालिस्ट सलामीवीरांसोबत उतरली होती, तरीही त्यांना मोठी खेळी करता आली नाही. भारतीय संघ अजूनही चौथ्या स्थानासाठी सक्षम पर्याय शोधू शकलेला नाही. त्यामुळे आता आगामी न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडिया वन डे संघासाठी अजिंक्य रहाणेच्या नावाचा विचार करू शकतात. 

बीसीसीआयनं नुकतंच न्यूझीलंड दौऱ्यातील पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाचा 16 सदस्यीय संघ जाहीर केला. याच दौऱ्यातील दोन कसोटी व तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठीचा संघ जाहीर करण्याचे राखून ठेवले. मुंबई मिररनं दिलेल्या वृत्तानुसार निवड समिती अजिंक्यचा वन डे संघासाठी विचार करत आहे. 2018मध्ये अजिंक्य अखेरची वन डे लढत खेळला होता आणि इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात त्याच्या नावाचा विचारही केला गेला नव्हता.

दरम्यान, कसोटी आणि वन डे संघ जाहीर न करण्यामागे आणखी एक कारण असल्याचे समजते. बीसीसीआयला अजूनही पृथ्वी शॉच्या तंदुरुस्ती अहवालाची प्रतीक्षा आहे. रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि त्यावर उपचारासाठी तो बंगळुरु येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या वन डे व कसोटी संघाची घोषणा येत्या रविवारी होण्याची शक्यता आहे.  
 

 

Web Title: Ajinkya Rahane might receive a recall for New Zealand ODIs, claims report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.