शाईच्या बाटल्या इतिहासजमा; आता म्हैसूर पेंट्सच्या 'मार्कर पेन'ने उमटणार मतदानाची निशाणी!
By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 10, 2026 19:47 IST2026-01-10T19:46:25+5:302026-01-10T19:47:36+5:30
तुमच्या बोटावरच्या अभिमानाची रेघ आता 'मार्कर'ने उमटणार.

शाईच्या बाटल्या इतिहासजमा; आता म्हैसूर पेंट्सच्या 'मार्कर पेन'ने उमटणार मतदानाची निशाणी!
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुकीत मतदान केंद्रावर गेल्यावर तुम्हाला एक वेगळा बदल पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत बाटलीतील शाईत काडी बुडवून बोटावर लावली जाणारी पारंपरिक पद्धत आता इतिहासजमा झाली असून, त्याऐवजी आधुनिक 'मार्कर पेन'चा वापर केला जाणार आहे.
शहरात ६ हजार मार्कर पेन दाखल
निवडणूक आयोगाने या प्रक्रियेसाठी शहरात ६ हजार विशेष मार्कर पेन उपलब्ध करून दिले आहेत. म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेडकडून तयार करण्यात आलेले हे पेन दोन दिवसांत सर्व निवडणूक केंद्रप्रमुखांना वितरित केले जातील.
शाई 'पक्की' असण्याचे विज्ञान
मार्करपेनच्या शाईमध्ये 'सिल्व्हर नायट्रेट' हा मुख्य घटक आहे. जेव्हा या पेनने बोटावर रेघ ओढली जाते, तेव्हा त्वचेतील प्रथिनांशी त्याची रासायनिक अभिक्रिया होऊन 'सिल्व्हर क्लोराईड' तयार होते. परिणामी, ही शाई पाण्याने कितीही धुतली तरी निघत नाही.
आयोगाने हा बदल का केला?
१. स्वच्छता : शाई सांडून कपडे किंवा टेबल खराब होण्याचे कर्मचाऱ्यांचे टेन्शन मिटले.
२. स्पष्टता : पेनामुळे बोटावर अधिक सुबक आणि स्पष्ट रेघ ओढणे सोपे झाले आहे.
३. पारदर्शकता : ही शाई रसायनयुक्त असल्याने ती पुसून टाकणे अशक्य आहे, ज्यामुळे बोगस मतदानाला पूर्णपणे आळा बसेल.
शाई कोठे लावली जाणार?
नियम : नियमानुसार, मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर (नखापासून त्वचेपर्यंत) उभी रेघ ओढली जाईल.
अपवाद : जर डावा हात नसेल तर उजव्या हाताच्या तर्जनीवर आणि दोन्ही हात नसतील तर पायाच्या बोटावर किंवा एखाद्याला पायसुद्धा नसतील तर खांद्यावर शाई लावली जाईल.
नगर परिषदेनंतर महानगरपालिका निवडणुकीत मार्कर पेनचा वापर
निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच डिसेंबरमध्ये नगर परिषद निवडणुकीत मार्कर पेनचा वापर करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला. यामुळे आता महानगरपालिका निवडणुकीत मार्कर पेनने मतदारांच्या बोटावर रेघ मारण्यात येईल.