छत्रपती संभाजीनगराला नवीन वर्षांत मिळणार २३ वे महापौर; यापूर्वी ७ महिला ठरल्या मानकरी!
By मुजीब देवणीकर | Updated: December 25, 2025 17:38 IST2025-12-25T17:37:59+5:302025-12-25T17:38:45+5:30
२२ महापौरांच्या देदीप्यमान वारशानंतर आता नवीन वर्षात छत्रपती संभाजीनगराला नव्या चेहऱ्याची उत्सुकता

छत्रपती संभाजीनगराला नवीन वर्षांत मिळणार २३ वे महापौर; यापूर्वी ७ महिला ठरल्या मानकरी!
छत्रपती संभाजीनगर : शहराला आजपर्यंत २२ महापौर लाभले. त्यात ७ महिला महापौरांचा समावेश आहे. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात शहराला २३ वे महापौर प्राप्त होतील. महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आणखी निघालेली नाही. १५ जानेवारीपूर्वी सोडत निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महापौरपद यंदा खुल्या प्रवर्गासाठी असेल का? किंवा आरक्षण असेल, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
शहराचे प्रथम नागरिक म्हणजे महापौर होय. या पदावर बसण्याची संधी फार कमी नगरसेवकांना प्राप्त होते. नियमानुसार अडीच वर्षांचा कार्यकाल महापौरपदाचा असतो. अलीकडे राजकीय पक्षांनी विविध नगरसेवकांना हा मान मिळावा, या दृष्टीने एक ते सव्वा वर्षांचा कार्यकाल केला होता. २०१५ ते २०२० या पंचवार्षिकमध्ये तीन जणांना संधी देण्यात आली. २०१० ते २०१५ मध्ये फक्त दोन जणांना संधी मिळाली. २००५ ते २०१० या पाच वर्षांमध्ये तीन जण महापौर पदावर बसले. शहराच्या पहिल्या महिला महापौर म्हणून सुनंदा कोल्हे यांना १९९५ मध्ये संधी देण्यात आली होती. पहिले महापौर १९८८ मध्ये शांताराम काळे होते.
आरक्षण सोडतीकडे लक्ष
१९८८ पासून आजपर्यंत महापालिकेच्या एकूण सहा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. सातवी निवडणूक आता जानेवारी महिन्यात घेण्यात येत आहे. १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारी रोजी मत मोजणी होईल. त्यानंतर नवनियुक्त ११५ पैकी बहुमत असलेल्या पक्षातील नगरसेवकांना महापौरपदाचे वेध लागतील. यंदाचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी की आरक्षित राहील, हे अद्याप जाहीर झालेले नाही. महापौरपदासाठी आरक्षण सोडत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून काढण्यात येईल. या सोडतीकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
आजपर्यंतचे महापौर, कार्यकाळ
नाव--------------------------कार्यकाळ
शांताराम काळे--------------१७-५-१९८८ ते ५-७-१९८९
मोरेश्वर सावे------------------५-७-१९८९ ते १९-५-१९९०
प्रदीप जैस्वाल----------------१९-५-१९९० ते १३-५-१९९१
मनमोहनसिंग ओबेरॉय-------१३-५-१९९१ ते २८-५-१९९२
अशोक सायन्ना यादव---------१८-५-१९९२ ते ३०-४-१९९३
सुनंदा कोल्हे------------------१९-४-१९९५ ते १८-४-१९९६
गजानन बारवाल--------------१८-४-१९९६ ते ७-५-१९९७
अब्दुल रशीद खान (मामू)----७-५-१९९७ ते २०-४-१९९८
शिला गुंजाळ------------------२०-४-१९९८ ते २०-४-१९९९
सुदाम सोनवणे----------------२०-४-१९९९- ते २९-४-२०००
डॉ. भागवत कराड-----------२९-४-२००० ते ३१-७-२००१
विकास जैन------------------४-९-२००१ ते २९-१०-२००२
विमल राजपुत---------------२९-१०-२००२ते ३-२-२००४
रुख्मिणी शिंदे---------------१२-२-२००४ ते २९-४-२००५
किशनचंद तनवाणी---------२९-४-२००५ ते ४-११-२००६
डॉ. भागवत कराड-----------१४-११-२००६ ते २९-१०-२००७
विजया रहाटकर------------२९-१०-२००७ ते २८-४-२०१०
अनिता घोडेले--------------२९-४-२०१० ते २८-१०-२०१२
कला ओझा-----------------२९-१०-२०१२ ते २८-४-२०१५
त्र्यंबक तुपे-----------------२९-४-२०१५ ते ३०-११-२०१६
भगवान घडमोडे----------१४-१२-२०१६ ते २८-१०-२०१७
नंदकुमार घोडेले-----------२९-१०-२०१७ ते २०-४-२०२०