चंद्रपूरमधील राजुरा मतदार संघातील बोगस मतदार नोंदणी उघडकीस येणार? निवडणूक आयोगाने सोपवली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 16:56 IST2025-10-07T16:55:23+5:302025-10-07T16:56:37+5:30
जिल्हाधिकारी विनय गौडा यांची माहिती : तपासाला गती मिळण्याची शक्यता

Will bogus voter registration in Rajura constituency in Chandrapur be exposed? Election Commission hands over information
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राजुरा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणी प्रकरण सध्या चर्चेत आहे. याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सर्व तांत्रिक माहिती पाठविली असून, त्यांनी ही माहिती राजुरा पोलिस स्टेशनला दिली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले. आता या प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार असून, लवकरच उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजुरा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणी प्रकरण पोलिस तपासात आले असून, या प्रकरणी राजुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, तपासासाठी अर्जदारांची आयपी अॅड्रेस, मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी यासारखी तांत्रिक माहिती न मिळाल्याने तपास मंदावला होता. आता राज्य निवडणूक आयोगाने ३० सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे यासंदर्भातील सर्व तांत्रिक माहिती पाठविली आहे. ही माहिती आता राजुरा पोलिसांकडे उपलब्ध आहे. या प्रकरणात लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे सातत्याने आवाज उठवत होते, तर शेतकरी संघटनेचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप यांनीही याकडे लक्ष वेधले होते.
वेळीच नाकारले अर्ज, जिल्हाधिकाऱ्यांचा दावा
- प्रकरण उघडकीस आल्यावर मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला होता. तेव्हा विधानसभा निवडणूक व्हायची होती.
- ६ हजार ८६१ ऑनलाइन अर्जात गंभीर त्रुटी आढळून आल्यानंतर हे अर्ज प्रशासनाने वेळीच नाकारले. यामुळे मतदार यादीत त्या नावांचा समावेश टळला. यासंदर्भात तेव्हाच पोलिस स्टेशनमध्ये गुन्हासुद्धा नोंद करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिली.