प्रसूतीसाठी रुग्णांचा भरवसा खासगीपेक्षा शासकीय रुग्णालयावर का वाढला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:24 IST2025-05-06T15:24:00+5:302025-05-06T15:24:29+5:30
Chandrapur : शासकीयमध्ये नैसर्गिक प्रसूती तर खासगीत सिझेरियनवर जोर

Why has patient confidence in government hospitals increased over private ones for delivery?
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वैद्यकीय क्षेत्रात रोज नव्याने बदल होत आहेत. या अत्याधुनिक बदलाच्या जोरावर शासकीय रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये चांगली सेवा मिळते, अशी अनेकांची धारणा झाली आहे. हे खरे असले, तरी खासगी रुग्णालयाच्या तुलनेत आजही शासकीय रुग्णालयात नैसर्गिक प्रसूती आणि ती देखील अगदी मोफत केली जाते.
आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक ती साधनसामुग्री, तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह मडिकल कॉलेज, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तसेच ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीची सोय उपलब्ध आहे. याठिकाणी मातेची नैसर्गिक प्रसूती व्हावी, यावर भर देण्यात येतो.
प्रसूती दरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्यास सिझेरियनचा निर्णय घेण्यात येतो. खासगी रुग्णालयात सिझेरियनसाठी येणारा खर्च सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही. विशेष म्हणजे, रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्यांपैकी अनेक गर्भवती महिला खासगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मागील काही वर्षामध्ये झालेल्या आरोग्यविषयक सुविधांमुळे शासकीय रुग्णालयाकडे अधिक रुग्ण जात आहे.
खासगीतून शासकीयमध्ये जाण्याची कारणे
खासगी रुग्णालयातील सिझेरियनचा खर्चाला मापदंड नसतो. या रुग्णालयातील खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसेल, तर ते शासकीय रुग्णालय गाठतात. त्या ठिकाणी मोफत प्रसूती करण्यात येते.
शासकीय रुग्णालयात नैसर्गिक प्रसूतीवर भर
शासकीय रुग्णालयामध्ये नेहमीच नैसर्गिक प्रसूती करण्यावर सर्वाधिक भर दिला जात असल्याचे आकडेवारीवरून समोर येते.
गुंतागुंतीची प्रसूती असल्यास खासगीत धाव
स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलांची काळजी घेणे, त्यांना धीर देणे आणि नैसर्गिक प्रसूती कशी होईल, यासाठी सर्व स्टाफ आपले कौशल्य पणाला लावत असतो. त्यामुळे अनेकवेळा गुंतागुंतीची वाटणारी प्रसूती देखील नैसर्गिक पद्धतीने केली जाते. खूपच गुंतागुंतीची प्रसूती असेल तेव्हाच त्यांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला देतो.
शासकीय रुग्णालयातून खासगीत जाण्याची कारणे
एखाद्या गरोदर मातेची प्रसूती होण्यास वेळ लागतो. अशा परिस्थितीत तज्ज्ञ डॉक्टर असताना महिलेच्या नातेवाइकांकडून अतिरिक्त काळजीपोटी शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयात नेले जाते.
रुग्णांकडून घेण्यात येते सेवेनुसार चार्जेस
खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी वेगवेगळे चार्जेस असतात, परंतु त्या बदल्यात सेवा देखील तशीच दिली जाते. तिथे एसी, डिलक्स रूम असतात. तुम्ही कशी सेवा घेता त्यावर चार्जेस अवलंबून असतात.
रिस्क नको म्हणून सिझेरिन
जिल्ह्यातील सिझेरियन प्रसूतीचे शासकीय रुग्णालयापेक्षा खासगी रुग्णालयामध्ये अधिक आहे. सुखरूप प्रसूती करण्यासाठी आणि रिक्स नको म्हणून खासगी रुग्णालातील डॉक्टर सिझेरिन करण्यावर भर देतात.