का होतो वारंवार गर्भपात ? याची संभाव्य कारणे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 18:45 IST2025-07-28T18:44:41+5:302025-07-28T18:45:02+5:30

Chandrapur : भारतात सुमारे १ ते ५ टक्के महिलांना वारंवार गर्भपाताचा करावा लागतो सामना

Why do miscarriages occur repeatedly? What are the possible causes? | का होतो वारंवार गर्भपात ? याची संभाव्य कारणे काय?

Why do miscarriages occur repeatedly? What are the possible causes?

चंद्रपूर : गर्भधारणा हा आशा आणि अपेक्षांनी भरलेला प्रवास असतो. परंतु, काही जोडप्यांसाठी तो वारंवार होणाऱ्या गर्भपातांमुळे दुःखद होतो, वारंवार गर्भपात होणे ही अशी स्थिती आहे, तेथे एखाद्या महिलेला २० आठवड्यांपूर्वी सलग दोन किंवा अधिक वेळा गर्भपात होतो. भारतात, सुमारे १ ते ५ टक्के महिलांना वारंवार गर्भपाताचा सामना करावा लागतो, तरीही ही समस्या दुर्लक्षित राहते. जरी एकदाच गर्भपात होणे हे सुमारे १०-१७टक्के गर्भधारणांमध्ये सामान्य असले, तरी वारंवार गर्भपात का होतो, याकरिता वैद्यकीय तपासणी केली पाहिजे, असा सल्ला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मोनिका कोतपल्लीवार यांनी दिला आहे.


उपचार कोणते ?
अनुवंशिक दोषांसाठी आयव्हीएफ, संप्रेरक असमतोलासाठी थायरॉइड औषधे, प्रोजेस्टेरोन सपोर्ट आणि मधुमेहाचे नियंत्रण, गर्भाशयातील दोषांसाठी शस्त्रक्रिया, रक्तातील गाठीसाठी ऑस्परिन व हिपरिन आदी उपचार केले जातात.


ही आहेत संभाव्य कारणे

  • आनुवंशिक कारणे : सुमारे २-५ टक्के वारंवार गर्भपात असलेल्या जोडप्यांमध्ये एक किंवा दोघांमध्ये क्रोमोसोम्सचे दोष आढळतात.
  • संप्रेरक, चयापचयातील अडथळे : थायरॉइड विकार (हायपो किंवा हायपरथायरॉइडिझम) हे गर्भधारणेतील संप्रेरकामध्ये अडथळा आणू शकतात.
  • गर्भाशयातील दोष: जन्मजात दोष जसे की सेप्टेट युटेरस (गर्भाशयात पडदा असणे) यामुळे गर्भधारणा कठीण होते. फायब्रॉइड्स किंवा पॉलिप्स हेही गर्भाच्या विकासात अडथळा आणू शकतात.
  • रक्तात गाठी होण्याचे विकार (थम्बोफिलिया) : रक्तात गाठी तयार होऊन अपुरा रक्तपुरवठा होतो आणि गर्भपात होतो. ऑस्परिन य हिपॅरिनसारख्या औषधांचे उपचार करून गर्भधारणा यशस्वी केली जाऊ शकते.
  • संसर्ग, प्रतिकारशक्तीचे दोष : क्लॅमिडिया, मायकोप्लाझ्‌मा किंवा टीबी संसर्ग गर्भपाताचा धोका वाढवतात.


"वेगवेगळ्या कारणांनी गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे गर्भधारणादरम्यान काळजी घेणे, तसेच आवश्यक त्या तपासण्या व डॉक्टरांचा सल्ला गरजेचा असतो. वारंवार गर्भपात होत असेल, तर तत्काळ फर्टिलिटी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, कारण समजून घेऊन योग्य उपचार करावे."
- डॉ. मोनिका कोतपल्लीवार, स्त्रीरोग तज्ज्ञ, चंद्रपूर

Web Title: Why do miscarriages occur repeatedly? What are the possible causes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.