मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागातून बदलून दुसऱ्या प्रभागात ! चंद्रपूरमध्ये मतदार यादीवर २ हजार ९५० आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:47 IST2025-10-27T13:42:31+5:302025-10-27T13:47:16+5:30
गडचांदूरमध्ये मतदार यादीवर २ हजार ९५० आक्षेप : नागरिक संतप्त; प्रशासनाने पथके केली तयार

Voters' names changed from their original ward to another ward! 2,950 objections to voter list in Chandrapur
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचांदूर (चंद्रपूर) : येथील नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबर २०२५ ला प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत तब्बल २ हजार ९५० आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. अनेक मतदारांची नावे त्यांच्या मूळ प्रभागातून बदलून दुसऱ्या प्रभागात गेल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजुरा मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान बोगस मतदार नोंदणीचे प्रकरण समोर आले. यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष घातल्यानंतर संपूर्ण देशाचे लक्ष या विधानसभा क्षेत्राकडे लागले. या सर्व गोंधळामध्ये आता गडचांदूर येथील २ हजार ९५० नागरिकांनी आक्षेप घेतल्यामुळे प्रशासनालाही चांगलाच घाम सुटला आहे. गडचांदूर नगर परिषदमधील नागरिकांनी स्वतःच्या नावाबाबत नमुना 'अ' फॉर्म भरून आक्षेप नोंदवले, तर काही ठिकाणी इतर तक्रारदारांनी नमुना 'ब' फॉर्म भरून संबंधित मतदारांविषयी आक्षेप सादर केले आहे. छाननी करण्यासाठी पथक तयार केले आहे.
प्रशासनाकडून अचूक मतदार यादी करण्याचा प्रयत्न
नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित आक्षेप नोंदवलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन मोका चौकशी (स्पॉट व्हेरिफिकेशन) केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रशासनाने आक्षेपांचे निराकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येक आक्षेपाची सखोल तपासणी करून मतदार यादी अचूक व पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोंबरला २०२५ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील त्रुटी दूर होण्यास मदत होईल आणि नागरिकांना योग्य प्रभागात मतदानाचा हक्क बजावता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
गडचांदूर नगर परिषद
एकूण मतदार २४४५६
पुरुष मतदार १२८९९
महिला मतदार ११५५७
एकूण प्रभाग १०
मूलमध्ये १५३ जणांनी घेतल्या हरकती
- मूल नगर परिषदच्या प्रारूप मतदार यादीवर प्रशासनाकडून १७ ऑक्टोबरपर्यंत आक्षेप-हरकती मागविण्यात आल्या होत्या.
- यात १५३ जणांनी आक्षेप नोंदविला. विशेषतः कुटुंबातील व्यक्तीचे वेगवेगळ्या प्रभागात नावे असल्याने एकाच प्रभागात आणण्यासाठी अर्ज सादर करण्यात आले.
- या आक्षेपावर सोमवारी (दि.२७) सुनावणी केली जाणार आहे. दरम्यान, नागभीडमध्य १४९ जणांनी आक्षेप नोंदविल्याची माहिती मिळाली आहे.