खोट्या सातबाऱ्याच्या आधारे आदिवासींची कोट्यवधींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:48 IST2025-08-01T19:47:57+5:302025-08-01T19:48:43+5:30
Chandrapur : कोलाम आदिवासी मजूर बांधवांच्या नावावर बनावट सातबारा तयार करून एक ते दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप

Tribals cheated of crores on the basis of false information
राजुरा : गडचांदूर येथील ग्रामीण बँकेतील मोठा घोटाळा उघडकीस आला असून, कोलाम आदिवासी मजूर बांधवांच्या नावावर बनावट सातबारा तयार करून एक ते दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अॅड. संजय धोटे यांनी केला आहे. त्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गडचांदूर येथील ग्रामीण बँकेत तीसहून अधिक कोलाम आदिवासी बांधवांच्या नावाने कर्ज उचलण्यात आले. मात्र, वास्तवात या आदिवासी बांधवांकडे शेतीच नाही.
बनावट सातबारा दाखवून त्यांच्या नावे कर्ज घेण्यात आल्याचे माजी आमदार अॅड. धोटे यांचे म्हणणे आहे. कर्ज प्रक्रियेत असंख्य स्तरांवर सह्या व पडताळणी होणे आवश्यक असते. त्यामुळे या आर्थिक घोटाळ्याची सखोल चौकशी करणे अत्यावश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावेळी युवा उद्योजक नीलेश ताजणे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष अनिल कौरासे, शुभम थिपे, तसेच कोरपना व जिवती तालुक्यातील कोलाम आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.