चंद्रपूरमध्ये पुरामुळे वाहतूक बंद; शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 18:34 IST2025-08-21T18:32:53+5:302025-08-21T18:34:25+5:30

पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त : वर्धा नदीच्या बॅकवॉटरने शिवनी चोर परिसर जलमय

Traffic disrupted due to floods in Chandrapur; Hundreds of hectares of farmland under water | चंद्रपूरमध्ये पुरामुळे वाहतूक बंद; शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

Traffic disrupted due to floods in Chandrapur; Hundreds of hectares of farmland under water

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :
वर्धा नदीच्या पुरामुळे बामणी- राजुरा पुलावरील वाहतूक बुधवारी (दि. २०) बंद करण्यात आली. या मार्गावरील वाहतूक सास्तीमार्गे वळविण्यात आली आहे. पुराच्या पाण्याने पूल बुडाले नाही. मात्र, सुरक्षा कठडे नसल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला. पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला. वर्धा नदीच्या बॅकवॉटरने शिवनी चोर परिसरातही शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. पाण्याची पातळी कमी झाल्यावरच वाहतूक सुरू करावी. कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही याची यंत्रणेने काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज पुलाच्या प्रशासनाला दिल्या. 


पाहणीदरम्यान अतिवृष्टीने इसापूर व सातनाला धरणांचे दरवाजे उघडताच वर्धा व पैनगंगा नद्यांना मोठा पूर आला. या पुराने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. कोरपना, जिवती, राजुरा, चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील पिकांना मोठा तडाखा बसला आहे. वर्धा नदीचे बॅक वॉटर पिकांत शिरले. त्यामुळे कापूस, धान व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. कोठारी परिसरातील शेतात शिरल्याने कापूस, सोयाबीन व मिरची पिकांना मोठा फटका बसला. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेलगत राजुरा तालुक्यातील विरूर, धानोरा, कविटपेठ, सिंधी, नलफडी, मूर्ती, विहीरगाव, सातरी, चणाखा, कोहपरा, पंचाळा, चुनाळा, बामनवाडा, चिंचोली, अंतरगाव, अन्नूर, अमृतगुडा, खांबाळा, सिर्शी आदी १९ गावांतील शेती पाण्याखाली आली होती. 


या परिसरात अद्याप पंचनामे करण्यात आलेले नाही. पंचनामा झाल्यानंतरच नुकसानीचे खरे चित्र पुढे येऊ शकते, अशी माहिती महसूल विभागाने दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा, कोरपना व गोंडपिपरी तालुक्यात पिकांची मोठी नासधूस झाली आहे.


जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी
बल्लारपूरः जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी बुधवारी (दि. २०) बामणी-राजुरा पुलाची तसेच शिवनी चोर (ता. चंद्रपूर) येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, बल्लारपूरचे नायब तहसीलदार साळवे, बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव जोशी, पोलिस निरीक्षक विपीन इंगळे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, मंडळ अधिकारी प्रवीण वरभे, तलाठी दिनेश काकडे, शिवनी चोरचे सरपंच रवींद्र पहानपट्टे आदी उपस्थित होते.


अशा आहेत यंत्रणेला सूचना

  • वर्धा नदीच्या बँक वॉटरमुळे परिसरातील पिके मोठ्या प्रमाणात पाण्याखाली आली. पूर ओसरल्यावर नुकसानग्रस्त शेतमालाचे पंचनामे अचूक पद्धतीने करावे.
  • उपविभागीय अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. पंचनामे करण्यात आलेल्या शेती व शेतकऱ्यांची यादी ग्रामपंचायतीमध्ये लावावी. पंचनामे करताना संबंधित मालकाचे नाव व त्यांचा मोबाइल क्रमांक नोंदवावा, जेणेकरून नुकसान भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्यात.


गोंडपिपरी तालुक्यात ३९५ शेतकऱ्यांना फटका
गोंडपिपरी तालुक्यात प्राथमिक अहवालानुसार, सर्वाधिक ३९५ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. यामध्ये कापूस, मिरची व सोयाबीन उत्पादकांचा समावेश आहे. त्याखालोखाल राजुरा तालुक्यातही ३७७ शेतकऱ्यांना पुराचा तडाखा बसला. पुरामुळे अनेकांचे पीक वाहून गेले. काहींच्या शेतात मलबा वाहून आल्याने उत्पादनाचे काही खरे नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.


तालुकानिहाय नुकसान (हेक्टर)
चंद्रपूर - ८३
बल्लारपूर - ४३५
वरोरा - ५७
राजुरा - ३७७
कोरपना - ३०. ८०
गोंडपिपरी - ३९५


पिकनिहाय      नुकसान (हेक्टर)
धान                      ८०
कापूस                ११३९.७०
सोयाबीन             १३५.५०
तूर                      ८.००
भाजीपाला              १५
मका                     ०५


आठ धरणे १०० टक्के भरली
जिल्ह्यातील आठ धरणे १०० टक्के भरली आहेत, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली. यामध्ये आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड, पकडीगुडुम, डोंगरगाव आदी धरणांचा समावेश आहे. इरई धरणात २०.६१, तर अमलनाल्यात ९१.५४ टक्के जलसाठा झाला आहे.


पंचनामा करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
पुराने मोठे नुकसान झाल्याने तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी प्रशासनाला दिले. पूरस्थितीचा त्यांनी व्हीसीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.


 

Web Title: Traffic disrupted due to floods in Chandrapur; Hundreds of hectares of farmland under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.