अवकाळी पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात तिघांचा मृत्यू; पाच दिवस पावसाचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 11:17 IST2025-05-05T11:16:36+5:302025-05-05T11:17:42+5:30
चंद्रपूर-मूल मार्ग बंद : गोंदिया, भंडाऱ्यातही गारपीट

Three killed in Chandrapur district due to unseasonal rains; Rains for five days
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर/चंद्रपूर : अवकाळी पावसाने दुसऱ्या दिवशीही चांगलाच धुमाकूळ घातला. रविवारी विदर्भातील काही जिल्ह्यांत विजा व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस व गाराही बरसल्या. अवकाळीच्या तडाख्याने चंद्रपूर जिल्ह्यात तिघांचा बळी घेतला. वीज पडून एका मेंढपाळाचा, तर वादळामुळे भिंत कोसळल्याने त्याखाली दबून एका महिलेचा मृत्यू झाला. तुटलेल्या वीज तारांच्या स्पर्शाने प्रभाकर गणपत क्षीरसागर रा. दाताळा यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास आकाशवाणी केंद्र परिसरातील घडली. जिवंत वीज तार रस्त्यावरील पाण्यात पडल्याने आणि या पाण्यातून जात असताना त्यांचा मृत्यू झाला.
चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी (दि. ४) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तसेच काही ठिकाणी गारा कोसळल्या. शंकरपूर येथून जवळच असलेल्या हिवरा येथे वीज पडून मेंढपाळाचा मृत्यू झाला. विकास ढोरे (४५, रा. नेरी) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, शनिवारी दाताळा येथे भिंत कोसळून बेबी लिंगायत या महिलेचा मृत्यू झाला होता. मूल-चंद्रपूर महामार्गावरील घंटा चौकी गावाजवळ मुख्य रस्त्यावरच वादळाने रविवारी सायंकाळी ६:३० वाजताचे दरम्यान भले मोठे झाड कोसळले. एक ते दीड तास या महामार्गावरील गडचिरोली, ब्रह्मपुरी जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.
दुसरीकडे वर्धा जिल्ह्यात सेलू तालुक्यातील सुरगाव परिसरात रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास गारांसह पाऊस झाला. सुमारे अर्धा तास बोरांच्या आकाराच्या गारा आकाशातून बरसल्या. यामुळे केळीसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नागपूर शहरासह जिल्ह्यात गारांसह पाऊस झाला. शहरातील दक्षिण व पूर्व भागात दुपारी ४ वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. सोबत गारांचाही पाऊस बरसला. त्यामुळे सावलीसाठी सिग्नलवर लावलेले छत फाटून उडाले. काही भागात विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्यातील खापरखेडा आणि कुही परिसरात पावसाची नोंद झाली. खापरखेडा भागात गाराही बरसल्या. दरम्यान, अवकाळी पावसाची स्थिती सोमवारीही राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मेळघाटात वादळ वारा तुरळक पाऊस
गंगाखेड गोठा व घरावरील टिन उडाली, एक जखमी रविवारी सायंकाळी चार वाजता च दरम्यान अचानक ढगाळ वातावरण आणि सोसाट्याचा वारा आला तुरळक पावसाने हजेरी लावली. चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ चुरणी परिसरात परिसराला त्याचा फटका बसला गांगरखेडा येथे काही घरांसह गुरांच्या गोठाचे तीन उडाले तीन लागून एक आदिवासी जखमी झाला तर बहिरम परिसरातील मध्यप्रदेशच्या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली श्यामलाल बाजीलाल कासदेकर रा गांगरखेडा असे जखमी आदिवासी इसमाचे नाव आहे त्याला हवेत उडून आलेला टिन लागल्याने जखमी झाल्याची माहिती आहे. चिखलदरा तालुक्यातील, मध्य प्रदेशला लागून असलेल्या काटकुंभ, भांडुप परिसरात सायंकाळी तुरडत पावसाचा जोरदार वादळ वारा आल्याने परिसरात काळोख पसरला होता. सर्वत्र धावा धाव सुरू झाली. भांडुप येथे सुद्धा काही घरांचे टिन पत्रे उडाल्याची प्राथमिक माहिती आहे.
बहिरम बैतूल मार्गावर पाऊस
रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवरील बहिरम, भैसदेही परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली ची
माहिती आहे.
भंडारा जिल्ह्यात सौम्य गारा, तुरळक पाऊस
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. रविवारीही सायंकाळी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस आला. पवनी तालुक्यात बोराएवढ्या गारांचा पाऊस पडला. जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी सायंकाळी ४ वाजल्यानंतर वादळी वारे वाहिले. मात्र पवनी वगळता पावसाची नोंद नाही. वादळामुळे जिल्ह्यात आंबे आणि मका पिकाचे नुकसान अधिक झाले आहे.
कोणत्या जिल्ह्यात कधी पावसाची शक्यता ?
मुंबई : राज्यात पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. मुंबईतही ६ आणि ७ मे रोजी पावसाची शक्यता आहे. ५ ते ७ मे दरम्यान नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव अवकाळीच्या तीव्रतेबरोबर गारपिटीची शक्यता आहे. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये ६ व ७ मे, मराठवाड्यात ७ मे, विदर्भात ५ मे रोजी अवकाळीबरोबर गारपिटीची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.