चाकूच्या धाकावर दुचाकीस्वारास लुटले, तिघांना अटक
By राजेश मडावी | Updated: April 18, 2023 14:58 IST2023-04-18T14:58:29+5:302023-04-18T14:58:43+5:30
आरोपींमध्ये बालकाचा समावेश

चाकूच्या धाकावर दुचाकीस्वारास लुटले, तिघांना अटक
चंद्रपूर : केळझर येथून टीव्ही दुरूस्तीचे काम आटोपून मूल तालुक्यातील केळझर-अजयपूर मार्गाने चिचपल्ली येथे घरी जात असताना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. अल्पवयीन मुलाला सुधारगृहात रवानगी केली. विक्की उर्फ मॅक्सवेल बळीराम मोटघरे (२०) रा. केळझर, शाहरुख शेख (२३) अशी आरोपींची नावे असून चिरोली येथील एका अल्पवयीन बालकाचाही गुन्ह्यात समावेश आहे.
चिचपल्ली येथील विशाल राजकुमार दुधे हा केळझर येथील एका ग्रामस्थाकडे टीव्ही दुरुस्ती करण्यासाठी गेला होता. काम आटोपून दुपारच्या सुमारास गावाकडे निघाला. दरम्यान केळझर-अजयपूर मार्गावरील मरारसावली पुलाजवळ अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून विशालच्या खिशातील ६४० रुपये बळजबरीने हिसकावले. चोरांपासून कसाबशी सुटका करून तो घरी पोहोचला. मूल पोलिसात तक्रार केली असता संशयावरून विक्की उर्फ मॅक्सवेल बळीराम मोटघरे,शाहरुख शेख व चिरोली येथील एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले. अल्पवयीन बालकाला सुधारगृहात पाठविले तर न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे व ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुद्धे करीत आहे.
पोलिसांसमोर आव्हान
केळझर-अजयपूर मार्गावर झोपला मारोती देवस्थान असून आजूबाजूला घनदाट जंगल आहे. युवक-युवती दुचाकी घेऊन फिरण्यासाठी देवस्थानकडे येतात. जंगलव्याप्त परिसराचा फायदा घेत युवक-युवतींना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या. युवक-युवती घरच्यांना माहिती न होता फिरायला येत असल्याने चोरीच्या घटना घडूनही बदनामीच्या भीतीपोटी पोलिसांत तक्रार करत नाही. चोरट्यांचा बंदोबस्त करणे पोलिसांसाठी आव्हान ठरले आहे.