अखेर 'त्या' बालकाचे आधार कार्ड झाले अपडेट, ‘लोकमत’च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 11:05 IST2023-06-24T11:01:54+5:302023-06-24T11:05:00+5:30
थेट जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

अखेर 'त्या' बालकाचे आधार कार्ड झाले अपडेट, ‘लोकमत’च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग
शंकरपूर (चंद्रपूर) : चिमुकल्याच्या फोटोऐवजी चक्क तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आधार कार्डवर असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. थेट जिल्हाधिकाऱ्यांनी वृत्ताची दखल घेत तत्काळ आधार कार्ड अपडेट करण्याचे आदेश दिले. त्यानंतर चिमूर तालुका प्रशासनाने गुरुवारी रात्री त्या चिमुकल्याचे आधार कार्ड अपडेट करून दिले.
सिंदेवाही तालुक्यातील विरव्हा येथील तिसऱ्या वर्गात शिकणारा जीगल सावसाकडे या मुलाच्या आधार कार्डवर त्याच्या फोटोऐवजी तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो होता. याच आधार कार्डवर अंगणवाडीपासून ते तिसऱ्या वर्गापर्यंत प्रवेश देण्यात आला. आधार कार्डवर फोटो चुकीचा असल्याची जाणीव त्याच्या आईला झाली होती. दरम्यान, मुलाचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जन्माचा दाखला हवा असल्याने ती शंकरपूर येथे आली होती. यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
काय सांगता? आधार कार्ड सात वर्षाच्या चिमुकल्याचे अन् फोटो देवेंद्र फडणवीसांचा
वृत्त प्रकाशित होताच जिल्हाधिकाऱ्यांनी जीगलचे आधार कार्ड अपडेट करण्याचे आदेश चिमूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर त्या मुलाचे आधार कार्ड अपडेटसाठी प्रशासनाने धावपळ सुरू केली. तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी शंकरपूर येथील तलाठी प्रदीप गुंजेवार यांना जीगलच्या कुटुंबीयांसोबत संपर्क साधून आधार कार्ड अपडेट करण्याबद्दल कळविले. त्यानंतर तलाठी गुंजेवार यांनी मुलाच्या आजोळी शिवरा येथे घरी जाऊन जिगल तसेच त्याच्या आईला शंकरपूर येथे आणले; परंतु आधार कार्ड केंद्र सहा वाजता बंद झाले. त्यामुळे तलाठ्याने जीगल तसेच त्याच्या आईला शिवरा येथे सोडून देत दुसऱ्या दिवशी आधार कार्ड अपडेट करू, असे सांगितले.
मात्र कोणत्याही स्थितीत आधार कार्ड आजच्या आजच अपडेट करा, असे वरिष्ठांचे आदेश असल्याने पुन्हा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने शंकरपूर येथे त्यांना रात्री नऊ वाजता आणण्यात आले. त्यानंतर रात्री नऊ वाजता तहसीलदारांच्या परवानगीने आधार केंद्र उघडून जीगलचे आधार कार्ड अपडेट करून देण्यात आले. या धावपळीत तलाठी प्रदीप गुंजेवार यांना शिवरा ते शंकरपूर अशा चार चकरा माराव्या लागल्या.
--