पट्टेदार वाघाच्या शिकारप्रकरणी ताडोबाचे अधिकारी आसामला रवाना
By राजेश मडावी | Updated: July 19, 2023 15:07 IST2023-07-19T15:06:03+5:302023-07-19T15:07:51+5:30
हरियाणातून चौघांना अटक : आसाम पोलिसांकडून वाघाची कातडी व हाडे जप्त

पट्टेदार वाघाच्या शिकारप्रकरणी ताडोबाचे अधिकारी आसामला रवाना
चंद्रपूर : चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील जंगलात एका पट्टेदार वाघाची शिकार आसाममधील शिकारींकडून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आसाम पोलिसांनी हरियाणातून बावरिया जमातीच्या चार जणांना अटक केली आणि गुवाहाटीमध्ये वाघाची ९ फूट लांबीची कातडी आणि सुमारे १९ किलो हाडे जप्त केली आहेत. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ताडोबाचे अधिकारी बुधवारी (ता. १९) आसामाला रवाना झाले आहेत.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात वाघांची वाढलेली संख्या बघता शिकारी सक्रिय झाले आहेत. २८ जून २०२३ रोजी आसाम पोलिसांनी हरियाणातून बावरिया जमातीच्या चार जणांना अटक केली आणि गुवाहाटीमध्ये वाघाची कातडी आणि हाडे जप्त केली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. या आरोपीचे नाव जाहीर केले नाही.
शिकार झालेला वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील असण्याची शंका आली. त्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे व्यवस्थापन सतर्क झाले. आरोपींचा छडा लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ताडोबाचे उपसंचालक (कोर) नंदकिशोर काळे आणि इतर काही अधिकारी एक-दोन दिवसांत या शिकार प्रकरणाच्या चौकशीसाठी आसामला भेट देणार आहेत. हे पथक गुवाहाटी पोलिस आणि या प्रकरणाचा तपास करणाऱ्या वन अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याची माहिती आहे.
''आसाम येथे पकडलेल्या शिकारीच्या मोबाईलचे लोकेशन चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दिसून आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपसंचालक (कोर) नंदकिशोर काळे आणि आणखी दोन अधिकारी बुधवारी आसामला रवाना झाले आहेत. चौकशी करून पथक परत आल्यानंतर अधिकची माहिती देता येईल.''
- डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर