भारतातील ५१ व्याघ्र प्रकल्पांत ताडोबा १४ व्या क्रमांकावर
By राजेश मडावी | Updated: April 25, 2023 14:26 IST2023-04-25T14:25:19+5:302023-04-25T14:26:34+5:30
एमईई पाचव्या टप्प्याचा निकाल, उत्कृष्ट श्रेणी मिळविण्यासाठी पुन्हा प्रयत्नांची गरज

भारतातील ५१ व्याघ्र प्रकल्पांत ताडोबा १४ व्या क्रमांकावर
चंद्रपूर :ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भारतातील राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांसाठी अलीकडील व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन प्रक्रियेत देशात १४ वा क्रमांक मिळाला आहे. असे असताना हे राष्ट्रीय उद्यान सध्या व्हेरी गुड कॅटेगरीत आले, तर या अभयारण्याला उत्कृष्ट श्रेणी मिळण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. महाराष्ट्रातील पेंच वन्यजीव प्रकल्प ८ व्या क्रमांकावर आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने देशातील राष्ट्रीय उद्याने व वन्यजीव अभयारण्यांसाठी २०२२ च्या व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यमापन (एमईई) प्रक्रियेच्या पाचव्या टप्प्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्या अंतर्गत पेरियार व्याघ्र प्रकल्पाला प्रथम स्थान घोषित केले. दुसरे स्थान अनुक्रमे सातपुडा, बांदीपूर व तिसरा क्रमांक नागरहोलला मिळाला.
ही रँकिंग ४ श्रेणींमध्ये विभागली आहे. केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालय व भारतीय वन्यजीव संस्था यांच्या मदतीने मूल्यांकन केले जाते. हे रँकिंग राष्ट्रीय उद्यान किंवा वन्यजीव अभयारण्य कसे व्यवस्थापित केले जाते, त्यांच्या मूल्यांचे संरक्षण करत आहेत का ? त्यांनी मान्य केलेली उद्दिष्टे व ते साध्य करत आहेत का ? इत्यादी परिभाषित करते. ही क्रमवारी ४ श्रेणीत विभागण्यात आली. ४० टक्क्यांपर्यंत गुण असलेला वन्य जीव प्रकल्प व राष्ट्रीय उद्यान निकृष्ट दर्जा देण्यात आला. ४१ ते ५९ टक्के गुण असलेला प्रकल्प स्वच्छ, ६० ते ७४ टक्क्यांपर्यंत गुण असलेला प्रकल्प उत्कृष्ठ व ७५ वरील रँकिंग सर्वोत्तम मानली जाते.