Admission Document Checklist: दहावी-बारावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनो पुढे ऍडमिशन घेण्यासाठी आत्ताच काढून ठेवा 'ही' कागदपत्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:27 IST2025-05-07T16:26:37+5:302025-05-07T16:27:56+5:30
Important Admission Documents: निकालानंतर पालकांसह विद्यार्थ्यांची होते घाई

Students who have appeared for 10th and 12th exams should keep these documents now for future admissions.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर आता बारावीचा निकालही लागला आहे. त्यामुळे पुढील वर्गातील प्रवेशासाठी विद्यार्थी-पालकांची गडबड सुरू होते. कोणत्याही शाखेत प्रवेश घ्यायचा झाल्यास त्याला दाखले, कागदपत्रे लागतातच. प्रवेशाची प्रक्रिया सुरू होताना अनेक विद्यार्थी कागदपत्रे, दाखल्यांबाबत संभ्रमात असतात. कधी-कधी महत्त्वाची कागदपत्रे राहून जातात, तर कधी काही महत्त्वाची माहिती भरणेही राहून जाते.
अनेकदा प्रवेशावेळी दाखल्यांची गडबड होते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आवश्यक महत्त्वाची कागदपत्रे आतापासून काढायला सुरुवात केल्यास विद्यार्थी-पालकांची प्रवेशावेळी होणारी धावपळ कमी होईल. विविध दाखल्यांसाठी प्रशासकीय वेळ लागतात, त्यामुळे पूर्वीच दाखवे काढून ठेवणे केव्हाही चांगले.
धावपळ टाळता येऊ शकते
विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दहावी-बारावीची मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, निवासी पत्त्याचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, जातप्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र ही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतात. अनेकवेळा निकालानंतर किंवा प्रवेशाच्या काही दिवस आधी विद्यार्थ्यांसह पालक प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करतात. अनेक विद्यार्थी कागदपत्रे, दाखल्यांबाबत संभ्रमात असतात. कधी-कधी महत्त्वाची कागदपत्रे राहून जातात.
ही कागदपत्रे आवश्यक
- डोमिसाइल-डॉगरी दाखल्यासाठी...
तलाठ्यांचा रहिवासी दाखला, आधारकार्डची झेरॉक्स, रेशनकार्डची झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाइड, जन्माचा दाखला.
- उत्पन्नाच्या दाखल्यासाठी...
तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला, आधारकार्डची झेराक्स, रेशनकार्डची झेरॉक्स, वडिलांचा फोटो
- जातीच्या दाखल्यासाठी...
तलाठी-सरपंच यांचा दाखला, मुलाचा व वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, विद्यार्थी व वडिलांचे आधारकार्ड, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला.
- राशनकार्ड काढण्यासाठी..
तलाठी-सरपंच यांचा दाखला, वडिलांचा उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, गॅस सिलिंडरचे कागदपत्र, कुटुंबप्रमुखाचे दोन फोटो.
प्रवेश अर्ज भरताना ही घ्या काळजी...
- कोणत्या शाईचे पेन वापरावे, कोणत्या भाषेत अर्ज भरावा, या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. त्यानंतर योग्य पद्धतीने अर्ज भरावा.
- प्रवेशासाठीचा अर्ज भरताना गुणपत्रिका, जातीचा दाखला, आधार कार्ड यांसारखी आवश्यक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत ठेवावे. ऑफलाइन अर्ज भरताना अर्जासोबत कागदपत्रे जोडण्यासाठी आवश्यक त्या गोष्टीही सोबत असाव्यात.
- अर्ज भरताना काही चूक होऊ नये, यासाठी तुम्ही आधी अर्जाची झेरॉक्स कॉपी काढून ती भरू शकता आणि त्यानंतर मूळ अर्ज भरा. ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून एका फोल्डरमध्ये किंवा पेनड्राइव्हमध्ये घेऊन सोबत ठेवा.