आमच्या 'भाषेचा' गोंधळ सोडवा, मराठीत एक अन् गणितात दुसरंच ; बालभारतीच्या पुस्तकात चुका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 14:48 IST2025-07-08T14:46:56+5:302025-07-08T14:48:36+5:30
Chandrapur : बालवयात शिकवायचं तरी काय?, शिक्षकांना पडला प्रश्न

Solve the confusion of our 'language', one thing in Marathi and another in mathematics; mistakes in Balbharti's book
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लहान मुलांना कोवळ्या वयात जर योग्य शिक्षण आणि माहिती मिळाली, तर तेच मूल पुढे जाऊन सजग नागरिक होऊ शकते. त्यामुळे बालशिक्षणातील प्रत्येक धडा आणि त्यातील प्रत्येक माहिती अचूक असणे आवश्यक आहे. मात्र, बालभारतीद्वारे पुरविण्यात आलेल्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकांत मराठी महिन्यांच्या नावाच्या माहितीमध्ये विसंगती असल्याने शिक्षकांचा सध्या गोंधळ उडत आहे.
मराठी आणि गणित या दोन्ही विषयांच्या पुस्तकांमध्ये मराठी महिन्यांची नावे दिली आहेत. मात्र, त्यामध्ये एकच महिन्याची दोन वेगवेगळी नावे या पुस्तकात नमूद आहे. दुसऱ्या वर्गातील मराठीच्या पुस्तकातील पान क्रमांक ४५ मध्ये 'वर्गकार्य' या उपक्रमाअंतर्गत इंग्रजी, मराठी महिन्यांचे नावे शोधा आणि लिहा, असे नमूद आहे. यामध्ये मराठी महिन्याचे नाव 'भाद्रपद' असे पूर्ण नाव लिहिले आहे. मराठी महिन्यातील सहावा महिना 'भाद्रपद' आहे, तर नवव्या महिन्याचे 'मार्गशीर्ष' असे नाव नमूद आहे. याउलट दुसरीच्याच पुस्तकात पान क्रमांक ३४ मध्ये भारतीय वर्षातील महिने यामध्ये सहाव्या महिन्याचे नाव 'भाद्रपद 'ऐवजी केवळ 'भाद्र' असे नमूद आहे, तर नवव्या महिन्याचे नाव 'मार्गशीर्ष' ऐवजी 'अग्रहायण' असे लिहिण्यात आले आहे. एकाच वर्गातील मराठी आणि गणित विषयातील पुस्तकांमध्ये मराठी महिन्यांची नावे वेगवेगळी दिल्याने नेमके कोणते नाव शिकवायचे? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
एकसमानता असणे आवश्यक
दुसरीच्या पुस्तकामध्ये एकाच महिन्याची नावे वेगवेगळी असल्याने नेमके कोणते नाव शिकवायचे यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने स्पष्ट करणे गरजचे आहे, अन्यथा भविष्यातही विद्यार्थ्यांचा गोंधळ निर्माण होऊ शकतो.
"एकाच वर्गातील दोन विषयांच्या पुस्तकांमध्ये मराठी महिन्यांची नावे वेगवेगळी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणते नाव शिकवायचे? हा प्रश्न शिक्षकांना पडतो. मार्गशीर्ष आणि अग्रहायण यांना समान मानले जाते. मात्र, दोन्ही पुस्तकांमध्ये एकसारखी संज्ञा असणे आवश्यक होते."
- जे. डी. पोटे, राज्य पुरस्कारप्रास्त शिक्षक, चंद्रपूर